मुंबई: माटुंगा येथील नामांकित व्हीजेटीआयमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली. राजेश भिमसिंग गोहर असे आरोपीचे नाव असून तो प्लेसमेंट एजन्सीचे काम करतो.एकीकडे महाविद्यालयीन प्रवेशासाठी चढाओढ सुरु असताना हा आरोपी राजेश गरजू विद्यार्थ्यांना गाठून गंडा घालत होता. सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या गोहर सोबत तक्रारदार मुलाच्या नातेवाईकांसोबत भेट झाली. मुलाला कॉम्प्युटर इंजिनियरच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेशाबाबत चर्चा गेली. अशात प्रवेशाच्या नावाखाली त्याने तब्बल साडेसहा लाख त्यांच्याकडून उकळले. मात्र पैसे देऊनही प्रवेशाबाबत गोहारकडून होत असलेली टाळाटाळ लक्षात घेता यात फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरुणाच्या नातेवाईकांनी तत्काळ सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.स्थानिक पोलिसांसह प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरु केला. गुप्त माहितीदारांमार्फत बुधवारी या पथकाने गोहरच्या मुसक्या आवळल्या.(प्रतिनिधी)
प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणारा गजाआड
By admin | Updated: July 31, 2015 03:09 IST