नागोठणे : नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे नागोठणे - रोहा मार्गावर नागोठणे ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दरवर्षी चाळणच होत असते. बांधकाम खात्याकडून या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी कधीतरी मलमपट्टी केली जात असली, तरी कायमस्वरूपी हा रस्ता सुधारण्यासाठी खात्याला मुहूर्त तरी मिळणार कधी, असा वाहनचालक व प्रवाशांचा सवाल आहे. नागोठणे - रोहा मार्गावरील पोयनाडपासून नागोठणेमार्गे आमडोशी फाट्यापर्यंतचा रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. येथील अंबा नदीवरील जुन्या ऐतिहासिक पुलावरून पंधरा वर्षांपूर्वी टेम्पो, एसटी बसेससह अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्याने रोह्याकडे जाणाऱ्या - येणाऱ्या आंबेघर फाट्यावरून वरवठणे मार्गे नागोठणे - रोहा मार्गावर यावे लागते. या रस्त्यांपैकी एमआयडीसी फाटा ते आमडोशी फाटा असे साधारणत: अडीच ते तीन किमी अंतर आहे व पुढे भिसे खिंडीचा चढाव लागतो. आमडोशी फाट्यावर या रस्त्याची विभागणी झाली असून फाट्यापर्यंतचा रस्ता अलिबाग, तर तेथून पुढे रोहेकडे जाणारा रस्ता महाड कार्यालयाच्या अंतर्गत येतो. महाड कार्यालयाच्या ताब्यात असणारा रस्ता खड्डेविरहीत अगदी गुळगुळीत असा आहे, मात्र नागोठण्यापासून या फाट्यापर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळणच झालेली आहे. या मार्गावरून दुचाकी, कार, जीप, एसटी बसेससह ट्रकसारखी हजारो वाहने दररोज जातात. रोहा एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये नोकरी करणारे शेकडो कामगार नागोठणे विभागात राहतात. बहुतांशी कामगार दुचाकीवरूनच दररोज प्रवास करतात. नियमितपणे दुचाकी या रस्त्यावरून न्यावी लागत असल्याने या रस्त्यामुळे दुचाकीची नेहमी दुरु स्ती करावी लागते आणि विशेष म्हणजे अनेक दुचाकीस्वारांना मणका तसेच मान आणि पाठदुखीला सामोरे जावे लागत आहे. अनेक कामगारांनी या रस्त्यावरून जाणेच बंद केले असून वाकण-आमडोशी किंवा कोलाड मार्गे असा द्रविडी प्राणायाम करून ते कामावर पोहोचत आहेत. या मार्गावरून मुरु ड तसेच रोह्याहून नागोठणे, जांभोशी, चोळे, पाली, पेण, पनवेल, मुंबई, ठाणे, पुणे, शिर्डी, कोल्हापूरकडे दररोज अनेक एसटी बसेस ये-जा करतात. यातील काही गाड्या दिवसभरात या रस्त्यावरून चार ते पाचवेळा फेऱ्या मारतात. या खड्ड्यातूनच त्यांना मार्गक्र मण करावे लागत असल्याने एसटीचा चालक तर बेजार होतोच, शिवाय प्रवाशांना खड्ड्यामुळे गचके खातच प्रवास करावा लागतो. (वार्ताहर)
नागोठणे - आमडोशी फाट्याला मुहूर्त मिळेना
By admin | Updated: March 15, 2015 22:27 IST