Join us  

देव तारी त्याला कोण मारी... १४ व्या मजल्यावरून पडली, फांदीमुळे वाचली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 9:35 AM

नशीब बलवत्तर म्हणून झाडांच्या फांद्या आणि इमारतीखालील शेडच्या पत्र्याला धडकत ती खाली कोसळत थोडक्यात बचावली आहे.

मुंबई : वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन १३ वर्षांची सखीरा शेख घराच्या खिडकीजवळ खेळत होती. घरातील मंडळी टीव्ही पाहण्यात व्यस्त असतानाच तोल जाऊन सखीरा खाली कोसळली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून झाडांच्या फांद्या आणि इमारतीखालील शेडच्या पत्र्याला धडकत ती खाली कोसळत थोडक्यात बचावली आहे. सखीरा सुखरूप असल्याचे पाहून सर्वांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सखीरा इस्माईल शेख (१३) असे मुलीचे नाव असून ती तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरूनगर येथील मिडासभूमी या सतरा मजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर राहते. वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. १० डिसेंबरला सखीराचा वाढदिवस थाटात पार पडला. दोन दिवसांपूर्वी वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन सखीरा ही घराच्या लिव्हिंग रूमच्या खिडकीजवळ खेळत होती. घरातील इतर सदस्य हे टीव्ही पाहण्यात व्यस्त असताना अचानक तळ मजल्यावर सुरू असलेला गोंधळ त्यांच्या मजल्यापर्यंत पोहोचला. नेमके काय झाले? हे पाहण्यासाठी तिचे आई-वडील देखील खाली आले. खाली जाऊन पाहिले तेव्हा सखीराभोवती माणसे गोंधळ घालताना दिसली. तेथे बसलेली सखीरा घाबरलेल्या अवस्थेत असतानाही व्यवस्थित बसून होती.

खासगी रुग्णालयानेही ‘तिला’ नाकारले...

  मुलगी १४ व्या मजल्यावरून खाली कोसळल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. आई-वडिलांनी तिला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. 

  तेथेही ती १४ व्या मजल्यावरून पडल्याचे सांगताच तेथील डॉक्टरांनीही तिला सायन रुग्णालयात नेण्यास सांगितले. 

  तेथून तिला सायन रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त करत मुलीला किरकोळ दुखापतीशिवाय काहीही झालेले नसल्याचे सांगितले. 

  २४ तास निगराणीखाली ठेवून तिला सोडण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

टॅग्स :मुंबई