Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील लक्झरी घरांच्या किमतींमध्ये घसरण; नाईट फ्रँक संस्थेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:08 IST

मुंबई : कोरोनाच्या काळात घर विक्रीला फटका बसल्याने सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली. यामुळे घर विक्रीला पुन्हा एकदा चालना ...

मुंबई : कोरोनाच्या काळात घर विक्रीला फटका बसल्याने सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली. यामुळे घर विक्रीला पुन्हा एकदा चालना मिळाली. बांधकाम क्षेत्रालादेखील यामुळे दिलासा मिळाला. मागील तीन महिन्यांमध्ये देशातील लक्झरी घरांच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाईट फ्रँक इंडिया संस्थेने सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. नाईट फ्रँकच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स अहवालात जगभरातील लक्झरी हाऊसिंग क्षेत्राच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील मुंबई, दिल्ली व बंगळुरू या शहरांचादेखील अहवाल देण्यात आला आहे. यामध्ये या शहरांमधील घरांच्या किमती काही प्रमाणात घसरल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मागील तीन महिने दिल्ली येथील लक्झरी घरांची किंमत सरासरी ३३ हजार ५७२ रुपये प्रति चौरस फूट एवढी राहिली आहे. बंगळुरू येथील लक्झरी घरांची किंमत १९ हजार २०० रुपये प्रति चौरस फूट तर मुंबई येथील लक्झरी घरांची किंमत सरासरी ६३ हजार ६९७ प्रति चौरस फूट एवढी राहिली आहे. यामध्ये दिल्लीतील घरांच्या किमती ०.२ टक्क्यांनी, बंगळुरू येथील घरांच्या किमती २.७ टक्क्यांनी व मुंबईतील घरांच्या किमती १.१ टक्क्यांनी घसरल्या आहेत. नाईट फ्रँक संस्थेने जगभरातील ४५ देशांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये अनेक शहरांमधील घरांच्या किमती मोठ्या फरकाने वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.

याविषयी नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल सांगतात की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनदेखील मागच्या तीन महिन्यात भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात घर खरेदीत मोठी उलाढाल झाली. यामध्ये सरकारने दिलेल्या सवलती व बँकांच्या कमी व्याजदरामुळे ग्राहकांनी लक्झरी घर खरेदी करण्यास पसंती दर्शविली आहे. यामुळे जगाच्या तुलनेत भारतातील घरांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.