Join us
Daily Top 2Weekly Top 5

फलाटावर फेरीवाल्यांचे बस्तान

By admin | Updated: April 12, 2016 01:16 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी कांजुर मार्ग स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला आणखी एक फलाट उपलब्ध केला जात आहे. या फलाटाचे लोकार्पण व्हायचे असताना, या नव्या फलाटावर फेरीवाल्यांनी बस्तान

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी कांजुर मार्ग स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला आणखी एक फलाट उपलब्ध केला जात आहे. या फलाटाचे लोकार्पण व्हायचे असताना, या नव्या फलाटावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. या अतिक्रमणाकडे रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) दुर्लक्ष होत असल्याने, फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या कांजुर मार्ग स्थानकाला हायटेक करण्यासाठी सुसज्ज फलाट, सरकते जिने आणि पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. या स्थानकाचा कायापालट करताना, प्रवाशांना आणखी एक फलाट उपलब्ध केला जात आहे, परंतु लोकार्पणाआधीच प्रवाशांनी या फलाट क्रमांक १ चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांसाठी असणाऱ्या या मोकळ््या फलाटांचा मात्र फेरीवाल्यांकडूनही गैरफायदा घेतला जात आहे. फलाटाचे काम अजूनही सुरू असून, मधल्या डब्याजवळ येणाऱ्या पायऱ्या, फलाटांवर फेरीवाल्यांचा वावर असतो. फलाटावर मेमरी कार्ड, पुस्तक, हेडफोन आणि तत्सम साहित्य विकण्यासाठी विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात. सध्या फलाटांवरील दिवे लावण्याचे काम सुरू असले, तरी फेरीवाले सायंकाळच्या वेळी बॅटरीच्या प्रकाशात बसतात. यात भर म्हणून स्थानकाबाहेर भिक्षेकरीही दिसू लागले आहेत. फलाटाच्या लोकार्पणाआधीच रेल्वे प्रशासनाचे फलाटांवर दुर्लक्ष झाले असून, हळूहळू स्टेशन आवारातच अनधिकृत फेरीवाले ठाणे मांडून बसतील आणि त्यामुळे फलाटांवर अस्वच्छता होईल, अशी शक्यता प्रवाशांनी उपस्थित केली आहे.