घराच्या लॉटरीसाठी फसवणुकीची शक्यता : अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहनमुंबई : म्हाडाकडून या वर्षीची घराची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच म्हाडाच्या नावे बनावट वेबसाइट बनविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याबाबत म्हाडाच्या दक्षता विभागाकडून शहानिशा केली जात आहे. म्हाडातर्फे मुंबईतील ९९७ आणि अंध व अपंग प्रवर्गातील प्रलंबित ६६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबात www.maharashtra.gov.in, www.mhada.gov.in.या संकेतस्थळांवर माहिती उपलब्ध असून, सर्व प्रक्रिया आॅनलाइन आहे. मात्र गेल्या ३ दिवसांपासून म्हाडाच्या नावे एक बनावट वेबसाइट कार्यरत आहे. ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांकडून त्याची शहानिशा करण्यात येत असून यावर लक्ष ठेवून कारवाई करू, असे म्हाडाने स्पष्ट केले. लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी यापासून सावध राहावे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. कोणत्याही व्यक्ती, एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे.