Join us  

‘त्या’ कॉलचा बनाव राऊत यांच्या सुरक्षेसाठी? निकटवर्तीय गँगस्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 6:49 AM

सुनील राऊत यांचा निकटवर्तीय गँगस्टर मयूर शिंदेला अटक, धमकीचे ३२ कॉल

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोनवरून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी गँगस्टर मयूर शिंदे याला बुधवारी रात्री अटक केली. त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

८ जून रोजी राऊत बंधूंना “सुबह का भोंगा बंद कर”नाहीतर गोळीने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. कांजूर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गोवंडीतून मोबाईल क्रमांकधारक रिजवान अन्सारीला अटक करण्यात आली. त्याने ते सिमकार्ड शाहिद अन्सारीच्या सांगण्यावरून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार, अन्सारीवर नवी मुंबईतून कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ आकाश पटेलला मानखुर्द येथे अटक केली. आकाशच्या चौकशीत ते सिमकार्ड मुन्नाला दिल्याचे समोर येताच मुन्ना शेखला धारावीतून बेड्या ठोकल्या. मुन्नाने जवळपास ३२ कॉल केल्याची माहिती समोर येत आहे. शेखने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीत, शासनाने संजय राऊत यांचे संरक्षण कमी केले. ते पुन्हा मिळावे म्हणून त्याने धमकीचे कॉल केल्याचे सांगितले आहे. पुढे, मयूरच्या सांगण्यावरून हे कॉल केल्याचे सांगताच, पोलिसांनी ठाण्याच्या वर्तकनगर येथून मयूरला अटक केली आहे.

धमकी प्रकरणाशी संबंध नाही : वकील

  • मयूर शिंदे याचा गुन्ह्यातील अटक आरोपींशी संबंध नाही. गेल्या काही वर्षांत तो समाजकार्यात सक्रिय आहे. 
  • कोणताही ठोस पुरावा नसताना ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 
  • आधीच्या बहुतांश केसेसमधून मयूर शिंदे निर्दोष सुटला असून गेल्या सहा ते सात वर्षांत त्याच्याविरोधात एकही गुन्हा नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. असे दावे मयूर शिंदे याचे वकील ॲड. प्रभाकर पारसे यांनी केले आहेत.

सिम कार्ड नष्ट...: कांजूरमार्ग पोलिसांनी धमकी प्रकरणात भादंवि कलम ५०६ (२) आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, अटक आरोपी मुन्ना शेख याने आमदार सुनील राऊत यांना धमकीचा काॅल केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेला मोबाइल आणि सिमकार्ड नष्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने ते कुठे फेकले, कुठून कॉल केला, याबाबतही पोलिसांना सांगितले आहे.

मयूर शिंदे आहे कोण?

कुख्यात गँगस्टर कुमार पिल्लई टोळीसाठी काम करणाऱ्या चार शूटर्सपैकी एक असलेला मयूर शिंदे याच्याविरोधात हत्याकांडसह गोळीबार, खंडणी, हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राजकीय वरदहस्तामुळे विविध पक्षातून अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होता. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्याशी घरचे संबंध असलेल्या शिंदे याला शिवसेनेने माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्षपद दिले होते. सुनील राऊत यांच्या आमदारकीच्या निवडणूक प्रचारात मयूर शिंदेची हजेरी होती. मुलुंडमध्ये पोलिसाला मारहाण केल्यानंतर त्याला तडीपार करण्यात आले. तेथून भाजपच्या तत्कालीन राज्यमंत्र्यांचा आधार घेत पक्षप्रवेश केला. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बातम्या झळकताच पक्षातून त्याची हकालपट्टी झाली. पुढे, ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरसेवकपदासाठी उमेदवारी देण्याची ऑफर दिल्यानंतर मयूर शिंदेने माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून तो ठाण्यातच होता. ठाण्याच्या सावरकरनगरातून त्याने नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, त्याच्या अटकेने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :संजय राऊतसुनील राऊत