Join us

अनुत्तीर्णांना पुन्हा ‘अपॉइंटमेंट’

By admin | Updated: March 26, 2015 01:46 IST

पक्के लायसन्सच्या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा चाचणी देण्यासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागणार असल्याचे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.

आरटीओच्या लायसन्स चाचणीत बदल : परिवहन विभागाचा निर्णय मुंबई : लायसन्सच्या चाचणी प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार लर्निंग लायसन्स (शिकाऊ) किंवा पक्के लायसन्सच्या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा चाचणी देण्यासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागणार असल्याचे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण होताच पुन्हा चाचणीसाठी सोयीनुसार चालकांना येता येणार नसल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात शिकाऊ आणि पक्के लायसन्सच्या चाचणीसाठी आॅनलाईन अपॉर्इंमेंट यंत्रणा बंधनकारक करण्यात आली आहे. या यंत्रणेचा परिवहन आयुक्तालयाकडून आढावा घेण्यात आला आणि त्यानुसार यंत्रणेत काही बदल करण्याचा निर्णय घेत परिपत्रक जारी करण्यात आले. ज्या कार्यालयात दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिकाऊ अथवा पक्क्या लायसन्स चाचणीच्या अपॉर्इंटमेंटसाठी प्रतिक्षा करावी लागते, त्या आरटीओंना या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये जे उमेदवार शिकाऊ लायसन्स चाचणी अथवा पक्क्या लायसन्स चाचणीत अनुत्तीर्ण होतील, त्यांना पुन्हा चाचणी देण्यासाठी नवीन अपॉर्इंमेंट घेणे अनिवार्य ठेवण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. याआधी एखादा उमेदवार अनुत्तीर्ण झाल्यास त्या उमेदवाराला साधारपणे सात दिवसांत त्याच्या सोयीप्रमाणे पुन्हा चाचणीसाठी येण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे लायसन्स चाचणीसाठी नव्याने येणाऱ्या उमेदवारांना त्याचा मनस्ताप होत होता आणि त्यांना मोठ्या रांगांना सामोरे जावे लागतानाच लायसन्सच्या चाचणीसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. हे टाळण्यासाठीच अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अपॉर्इंटमेंट घेणे बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आल्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गैरहजर उमेदवारांनाही नवीन अपॉर्इंटमेंट घेणे आवश्यक राहणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)सुटीच्या दिवशी लायसन्स चाचणीला प्राधान्य द्याच्एखाद्या आरटीओ कार्यालयात लायसन्स चाचणीचा मोठा भार असेल तर त्या आरटीओ कार्यालयाने त्यांच्या सोयिनुसार शनिवारी, रविवारी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी शक्य त्याप्रमाणे चाचणी यंत्रणा सुरु ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. यामुळे सुट्टीच्या दिवशीही आरटीओ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.