ठाणे : ठाणे परिवहन सेवेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी महापालिकेने किरकोळ स्वरूपातील बसेस दुरुस्तीसाठी ३ कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. परंतु, हा निधी पुरेसा आहे अथवा नाही, याचा अभ्यास मात्र परिवहनने अद्याप केलेला नाही. त्यामुळे किती निधी दुरुस्तीसाठी लागतो, याचे नियोजन आता परिवहनने सुरू केले आहे. परंतु, मोठ्या दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ११० बसेसची दुरुस्ती केव्हा होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. ठाणे परिवहनची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा ढासळलेली आहे. त्यामुळे सध्या रस्त्यावर वागळे आगारातून १०८ आणि कळवा आगारातून केवळ ३० अशा १३८ बसेसच धावत आहेत. कमी प्रमाणात त्या रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांची संख्या आता अडीच लाखांवरून थेट १ लाख ७० हजारांच्या घरात आली आहे. तसेच किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात ५० बसेस उभ्या आहेत, तर ११० बसेस मोठ्या दुरुस्तीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आगारात धूळ खात पडून आहेत. परंतु, केवळ निधी नसल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी परिवहनने आपला हात आखडता घेतला होता. परंतु, शुक्रवारी आयुक्तांसमवेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वागळे आगाराची पाहणी केल्यानंतर आयुक्त असीम गुप्ता यांनी किरकोळ दुरुस्तीच्या असलेल्या बसेससाठी ३ कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, परिवहन प्रशासनालाच या बसेस दुरुस्तीसाठी किती निधी लागू शकतो, याचा अंदाज नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी आता याचा अभ्यास सुरू केला असून किती निधी लागू शकतो, याचा अहवाल पालिकेला सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
निधीअभावी बसेस आगारातच पडून
By admin | Updated: July 7, 2014 00:22 IST