Join us  

रुग्णावर उपचार करण्यात अपयशी; दोन रुग्णालयांना नुकसान भरपाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 3:46 AM

ग्राहक मंचाचा दणका : वैद्यकीय निष्काळजीचा ठपका; रुग्णाच्या पत्नीला १५ लाख देण्याचे निर्देश

मुंबई : एका रुग्णालयाला रुग्णाच्या दुखण्याचे निदान न करता आल्याने, तर दुसऱ्या रुग्णालयाला रुग्णावर योग्य वेळेत उपचार न केल्याबद्दल राज्य ग्राहक आयोगाने दोषी ठरवत रुग्णांच्या पत्नीला १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाने २०१० मध्ये चाळीस वर्षीय बीपीसीएल कर्मचाऱ्याला हृदयाचा आजार असताना मलेरियाचे उपचार केले. त्यांची पत्नी स्वाती हिने त्यांना चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात हलविले. मात्र या रुग्णालयाने उपचार करण्यास विलंब केला. त्यामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, असे स्वाती यांचे म्हणणे आहे.२०११ मध्ये स्वाती यांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करीत या दोन्ही रुग्णालयांकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती केली. तक्रारीनुसार, १० मे २०१० रोजी त्यांच्या पतीला अस्वस्थ वाटू लागले व थोडा तापही होता. त्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर मलेरियाचे उपचार करण्यात आले.घरी आल्यावर पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे दत्ता शेरखाने यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. ईसीजीवरून त्यांच्या पतीला हृदयाशी संबंधित गंभीर आजार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दत्ता यांना चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात हलविण्यात आले.पतीची प्रकृती नाजूक असतानाही सुश्रुत रुग्णालयाने त्यांच्या चाचण्या केल्या नाहीत किंवा तज्ज्ञ डॉक्टरांनाही बोलविले नाही. दुसºया दिवशी पतीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलविले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, असे स्वाती यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र दोन्ही रुग्णालयांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. रुग्णावर योग्य वेळेत योग्य उपचार करण्यात आल्याचे दोन्ही रुग्णालयांनी आयोगाला सांगितले.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर ग्राहक आयोगाने दोन्ही रुग्णालयांचे डॉक्टर, प्रशासक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याबद्दल दोषी ठरवत रुग्णाच्या पत्नीला १५ लाख रुपये नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून १५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.वेळीच उपचार न केल्याचे निदानमहापालिका रुग्णालयाला रुग्णाच्या आजाराचे निदान करू शकले नाही; तर दुसऱ्या सुश्रुत रुग्णालयाला रुग्णाचा आजार समजला परंतु त्यांनी रुग्णावर वेळीच उपचार केले नाहीत, असे निरीक्षण आयोगाने नोंदविले. आयोगाने दोन्ही रुग्णालयांना रुग्णाच्या पत्नीला १५ लाख रुपये नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून १५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :हॉस्पिटल