Join us  

Devendra Fadnavis tests positive for Covid-19: फडणवीसांनी शब्द पाळला, सरकारी रुग्णालयातच घेताहेत कोरोनावरील उपचार  

By महेश गलांडे | Published: October 24, 2020 4:07 PM

Devendra Fadnavis tests positive for Covid-19: 'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होते.

ठळक मुद्देविशेष म्हणजे फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही नेटीझन्सकडून फडणवीसांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात येत आहे. तसेच, सरकारी रुग्णालयात ते उपचार घेणार का, असा प्रश्नही काही जणांकडून विचारण्यात आला.

मुंबई - राज्यावरील कोरोना संकट अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. अनेक राजकीय नेत्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नेते कोरोनावर मात करून परतले आहेत. या संकट काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर, गिरीश महाजन यांच्याशी बोलताना, त्यांनी कोरोनाची लागण झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल कर, असे म्हटले होते. फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, संपर्कातील व्यक्तींना आवाहन

'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होते. फडणवीस यांचे शब्द ऐकताच महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि काय बोलावं हेच त्यांना सुचेनासं झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही नेटीझन्सकडून फडणवीसांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात येत आहे. तसेच, सरकारी रुग्णालयात ते उपचार घेणार का, असा प्रश्नही काही जणांकडून विचारण्यात आला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज हे सरकारी रुग्णालय आहे. 

कोरोना कालावधीत फडणवीसांचे दौरे

राज्यातील कोरोना परिस्थिती, रुग्णांलयामध्ये मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. या माध्यमातून ते पालिका आणि आरोग्य प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोविड रुग्णालयांना भेटी देऊन ते स्वत: परिस्थितीची पाहणी करत होते फडणवीस यांच्या दौऱ्यांची संख्या पाहता त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत आहे. म्हणून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून ही सूचना दिली.

फडणवीस यांच्यासाठी चाहत्यांची प्रार्थना

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच Get Well Soon असे मेसेज लिहून फडणवीस यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. ट्विटर आणि फेसबुकवरुन नेटीझन्स आपल्या भावना व्यक्त करत आहे. तर, काहीजण फडणवीस यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत होते.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यादेवेंद्र फडणवीसहॉस्पिटलमुंबई