Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोमानियात फडकला तिरंगा

By admin | Updated: April 19, 2016 02:41 IST

रोमानिया येथे पार पडलेल्या पाचव्या ‘युरोपियन गर्लस् मॅथेमॅटिक्स आॅलिम्पियाड’ (इगमो) स्पर्धेत तामिळनाडूतील उमा तिरुनेल्लाईने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे

मुंबई : रोमानिया येथे पार पडलेल्या पाचव्या ‘युरोपियन गर्लस् मॅथेमॅटिक्स आॅलिम्पियाड’ (इगमो) स्पर्धेत तामिळनाडूतील उमा तिरुनेल्लाईने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. उमाच्या या देदीप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनने मानखुर्द येथील होमी भाभा सेंटरमध्ये दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते.‘द रोमानियन मॅथेमॅटिक्स सोसायटी’ आणि ‘राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन मंत्रालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने रोमानिया येथील बुस्टेनी शहरात १० ते १६ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. गणितीशास्त्रातील प्रतिष्ठित आणि अवघड समजली जाणारी जागतिक स्पर्धा अशी ‘युरोपियन गर्लस् मॅथेमॅटिक्स आॅलिम्पियाड’ची ओळख आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, जपान, मेक्सिको अशा एकूण ३९ देशांच्या १५० प्रतिस्पर्धींमधून उमाने हा बहुमान पटकावला.उमा तिरुनेल्लाईसह पश्चिम बंगालच्या हायमोश्री दास या दोघींनी स्पर्धेत देशाचे नेतृत्व केले. उमा आणि हायमोश्री यांच्यासह टीम लीडर डॉ. व्ही.एम. सोलापूरकर, डॉ. नरसिंहन चारी आणि निरीक्षक म्हणून मंगला गुर्जर असा संघ रवाना झाला. १२ व १३ एप्रिल या कालावधीत झालेल्या स्पर्धेत उमाने ४२पैकी १५ गुणांची कमाई केली.