विक्रमगड : तालुक्यातील शीळ-झडपोली येथे तंत्रनिकेतन विद्यालयाच्या आवारात होत असलेल्या बेकायदा उत्खननामुळे आणि बांधकामामुळे शासनाचा लाखो रू.चा महसूल बुडत आहे. याकडे तहसीलदार कार्यालय डोळेझाक करीत असल्याचा आरोप तक्रारदार ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांनी केला आहे. अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयात लेखी तक्रारही केली होती. परंतु कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर तक्रारदार ज्ञानेश्वर सांबरे उपोषणाचे हत्यार वापरणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.शासनाची तुटपुंजी रॉयल्टी काढून प्रत्यक्षात मात्र लाखो रू.च्या गौणखनिजाची चोरी होत आहे. तसेच वसतिगृहाच्या बिलातही अफरातफर आली असून बांधकाम अपूर्ण असतानाही कामाच्या जादा खर्चाची रक्कम अदा केली आहे, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम, विभाग विशेष प्रकल्प यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. याबाबत तहसीलदार यांना विचारले असता यासंबंधीचा बांधकाम विभागातून अहवाल मागविण्यात आला असून चौकशीदरम्यान योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे एस.वाय. सोनावणे यांनी सांगितले. तर तक्रारदाराचे समाधान होत नाही व कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण करणार, असे ज्ञानेश्वर सांबरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
बेकायदा उत्खनन तहसील कार्यालयाचा डोळेझाकपणा
By admin | Updated: December 14, 2014 23:34 IST