Join us
Daily Top 2Weekly Top 5

माऊंट मेरी जत्रेनिमित्त जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 01:04 IST

वांद्रे रेल्वे स्थानकापासून माऊंट मेरी चर्चपर्यंत साडेतीन किलोमीटरचे अंतर आहे.

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील माऊंट मेरीची जत्रा रविवारपासून सुरू झाली. ख्रिश्चन बांधवांसह इतर धर्मियांचेही श्रद्धास्थान असलेल्या या जत्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्ट प्रशासनाने चारशे अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस वांद्रे पश्चिम स्थानक ते माऊंट मेरी चर्च या मार्गावर आणि इतर भागांतूनही माऊंट मेरीपर्यंत धावणार आहेत. ही यात्रा १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

या यात्रेला मुंबईसह देशभरातील भाविक येत असतात. भाविकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. यामुळे बेस्टतर्फे अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. जत्रेच्या शेवटच्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी दिवसभरात ९४ अतिरिक्त बसेस यात्रेतील भाविकांसाठी सोडल्या जाणार आहेत. वांद्रे पश्चिमेकडे टेकडीवर असलेले माऊंट मेरी चर्च ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आंतरिक सजावटीसाठी हे चर्च प्रसिद्ध आहे. या चर्चमध्ये मरियमच्या दोन प्रतिमा आहेत. मेरीला समर्पित हे चर्च टेकडीवर बांधण्यात आले आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकापासून माऊंट मेरी चर्चपर्यंत साडेतीन किलोमीटरचे अंतर आहे. टॅक्सी आणि रिक्षाने येथे जाण्यास सात मिनिटे लागतात. १८७९ मध्ये बोमनजी जिजीभॉय यांनी या टेकडीच्या उत्तरेला पायऱ्या बांधल्या. १८८२ मध्ये चर्चच्या इमारतीसमोर एक सभागृहही बांधण्यात आले. परंतु १९ व्या शतकाच्या अखेरीस सप्टेंबरमधील वाढत्या भाविकांना सामावून घेण्यासाठी नवीनच चर्च बांधण्याचे ठरवण्यात आले. शापूरजी चढ्ढाभॉय या वास्तुविशारदाने निओ-गोथिक पद्धतीने नवीन प्रार्थनास्थळाची आखणी करून ते बांधले.