Join us  

गर्दीच्या नियोजनासाठी लोकल फेऱ्यांचा परळ टर्मिनसपर्यंत विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 5:26 AM

बदललेल्या वेळापत्रकाची उद्यापासून अंमलबजावणी

मुंबई : मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल केला असून, ४२ उपनगरी लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गर्दीच्या नियोजनासाठी काही लोकल फेºयांचा विस्तारही केला आहे. विशेषत: दादर येथील गर्दीचा विचार करता तीन लोकल परळ टर्मिनसपर्यंत विस्तारल्या आहेत. परिणामी, परळ टर्मिनस येथील लोकल फेºयांची संख्या ३५ वरून ३८ झाली आहे. याशिवाय कर्जत-ठाणे, अंबरनाथ-दादर या दोन लोकलचा सीएसएमटीपर्यंत विस्तार केला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाचे नवे वेळापत्रक १४ डिसेंबरपासून लागू होईल. नव्या वेळापत्रकानुसार, कसारा येथून मुंबईत येणाºया प्रवाशांना दिलासा मिळेल. कारण कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ही पहिली लोकल आता पहाटे ३.५१ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होईल. तर, कर्जतहून पहिली लोकल पहाटे ४.३२ वाजता रवाना होईल. अर्धजलद बदलापूर-सीएसएमटी लोकल पूर्ण जलद केल्याने सकाळी ९ वाजता सुटणारी लोकल आता ९.०८ वाजता सुटेल. ४२ लोकलच्या वेळेत सुमारे ५ मिनिटांचा बदल केला असला तरी, ८५८ लोकल फेºयांच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही.

परळपर्यंत विस्तार

कल्याण येथून सकाळी ६.०८ वाजता सुटणारी दादर लोकल आता परळपर्यंत चालविण्यात येईल. परळ येथे सकाळी ८.०२ वाजता पोहोचेल.टिटवाळा येथून सकाळी ९.५४ वाजता सुटणारी ठाणे लोकल परळपर्यंत चालविण्यात येईल. परळ येथे सकाळी ११.२२ वाजता पोहोचेल. कल्याण येथून सकाळी ११.१७ वाजतास सुटणारी दादर लोकल परळपर्यंत चालविण्यात येईल. परळ येथे ती दुपारी १२.२२ वाजता पोहोचेल.

कर्जत-ठाणे लोकल सीएसएमटीपर्यंत धावणार

कर्जत येथून दुपारी १२.२१ वाजता सुटणारी ठाणे लोकल आता दुपारी १२.२३ वाजता सुटेल. ती सीएसएमटीपर्यंत चालविण्यात येईल. तेथे २.१८ वाजता पोहोचेल.कल्याण येथून दुपारी १.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल १.०९ वाजता सुटेल; ठाणे येथे ती १.४० वाजता येईल.अंबरनाथ येथून दुपारी ३.०६ वाजता सुटणारी दादर लोकल आता सीएसएमटीपर्यंत चालविण्यात येईल. तेथे ती ४.२२ वाजता पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी ६.१६ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आता कल्याण येथून सकाळी ५.४४ वाजता सुटेल आणि ७.१२ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. दादर येथून दुपारी ४.१३ वाजता सुटणारी बदलापूर लोकल आता सीएसएमटी येथून ३.४८ वाजता सुटेल आणि बदलापूर येथे ५.११ वाजता पोहोचेल. दादर येथून दुपारी १२.३७ वाजता सुटणारी डोंबिवली लोकल आता परळ येथून १२.३४ वाजता सुटेल व डोंबिवली येथे १.३९ वाजता पोहोचेल.

सीएसएमटी येथून सकाळी ११.४२ वाजता सुटणारी कल्याण लोकल आता परळ येथून सकाळी ११.४२ वाजता सुटेल व कल्याण येथे १२.५६ वाजता पोहोचेल. दादर येथून सकाळी ८.०७ वाजता सुटणारी कल्याण लोकल आता परळ येथून सकाळी ८.११ वाजता सुटेल व कल्याण येथे ९.२२ वाजता पोहोचेल.

टॅग्स :मध्य रेल्वेप्रवासीमुंबईभारतीय रेल्वे