Join us  

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:21 AM

संघटनेची मागणी; लॉकडाउनमुळे पैसे गेले वाया

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता रेल्वे सेवा बंद आहे. एक्स्प्रेसच्या प्रवाशांना तिकीट परतावा मिळत आहे. मुंबई उपनगरी लोकल सेवाही बंद आहे. त्यामुळे पासचे पैसे वाया गेल्याने रेल्वे प्रशासनाने पासचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली.

रेल्वेच्या उपनगरी सेवेचा लाभ सुमारे ७५ लाख प्रवासी घेतात. दोन्ही मार्गावर लाखो पासधारक आहेत. मासिक, त्रैमासिक पासधारकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यांच्याकडून रेल्वेला पासाच्या रूपात आगाऊ रक्कम मिळते. मात्र, लॉकडाउनमुळे पासाचे पैसे वाया गेले. त्यामुळे या कालावधीत ज्यांनी पास काढले त्यांची पासाची तारीख वाढवून द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार केला आहे. पासधारकांविषयी त्यांनी त्वरित निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. तर, यासंदर्भात रेल्वे मंत्रालय लोकल सुरू होण्याआधी निर्णय घेईल, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

टॅग्स :लोकलभारतीय रेल्वे