Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथ मोते, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

By admin | Updated: January 24, 2017 15:45 IST

शिक्षक परिषदेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणे, प्रचार करणे तसेच संघटनेविरोधात काम करण्याचा ठपका ठेवत शिक्षक परिषदेने आज मोठी कारवाई

 ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 24 - शिक्षक परिषदेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणे, प्रचार करणे तसेच संघटनेविरोधात काम करण्याचा ठपका ठेवत शिक्षक परिषदेने आज मोठी कारवाई  केली आहे आमदार रामनाथ मोतें , शेषराव बीजवार यांच्यासह अनेकांची आज संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली.  शिक्षक परिषदेची राज्य कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक परिषदेचे राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी याबाबतची घोषणा केली. या बैठकीला शिक्षक परिषदेचे भगवान साळुंखे, संजीवनी रायकर, बाबासाहेब काळे, सुनील पंडित यांच्यासह राज्य कार्यकारिणीत सर्व सदस्य उपस्थित होते. कोकण, नागपूर व औरंगाबाद विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकीत शिक्षक परिषदेने कोकणमधून वेणूनाथ कडू, नागपूर मधून नागोजी गाणार व औरंगाबाद मधून सतीश पत्कींना उमेदवारी दिली आहे. कोकण विभागातून दोन वेळा रामनाथ मोतेंना उमेदवारी दिली होती यंदामात्र परिषदेने वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिली.12 वर्षे आमदारकी  उपभोगल्यावर सुद्धा तिसऱ्यांदा मोते यांना उमेदवारी हवी होती ती संघटनेने नाकारली असता त्यांनी बंडखोरी केली आहे तर दुसरीकडे नागपूर विभागात शिक्षक परिषदेने  नागोजी गाणार यांना उमेदवारी देताच शेषराव बीजवार यांनी बंडखोरी केली संघटनेच्या विरोधात कृती केल्याने रामनाथ मोतें सह शेषराव बीजवार तसेच कोकण विभागातून शंकर मोरे, रमेश जाधव, राधाकृष्ण जोशी, सलीम  तकिलदार, एस.जी. पाटील, संदीप कालेकर, दादाजी निकम, चंद्रकांत बिरारी, सुधीर घागस, ज्ञानेश्वर गोसावी तर नागपूर विभागातून उल्हास फडके, सुदाम काकपुरे व दीपक गोखले आदी पदाधिकाऱ्यांना संघटनेतून निलंबित करण्यात आले आहे. 
शिक्षक परिषदेचे बॅनर वापरल्यास फौजदारी गुन्हे
बंडखोरांनी शिक्षक परिषदेचे बॅनर अथवा नाव वापरल्यास त्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही शिक्षक परिषदेने स्पष्ट केले आहे.