खालापूर : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरमध्ये भीषण असा अपघात झाला. यात मागून येणाऱ्या मर्सिडीज कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. यावेळी लागलेल्या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून कंटेनरमधील दुचाक्यांना तत्काळ आग लागल्याने कंटेनरही आगीत जळाला. आज दुपारी दोनच्या सुमारास मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील माडप बोगद्यामध्ये पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून येणारी मर्सिडीज कार (एमएच - ०६ - एएफ ३०४०) धडकली असता कंटेनरला आग लागली. सुदैवाने दिलीप शिवदे व त्यांचे सहकारी यातून बाहेर पडले. धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे कंटेनरच्या मागील भागाने पेट घेतला व आतमध्ये असलेल्या अनेक बुलेट मेकच्या मोटारसायकली क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कार पूर्णपणे जळून खाक झाली. भीषण अपघाताने एक्स्प्रेस वेवर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याने पोलिसांनी काहीकाळ वाहतूक जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर वळविली. आयआरबी, बोरघाट, पळस्पे, खालापूर पोलीस व खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते गुरु नाथ साठेलकर आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे यशस्वी प्रयत्न केले. या अपघातात जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अपघाताच्या घटनेने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. (वार्ताहर)
एक्स्प्रेस वेवर वाहनांना आग
By admin | Updated: December 16, 2014 22:36 IST