मुंबई : जेथे दीर्घकाळ वीज बिलांची वसुली होत नाही, अशा मोजक्याच फिडरवर तीन महिन्यांकरिता प्रायोगिक तत्त्वावर फिडर मॅनेजर नेमण्यात येणार असून, या अनुभवावरून योजनेच्या पुढील अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक संवाद) राम दोतोंडे यांनी दिले आहे.दैनिक ‘लोकमत’च्या शुक्रवारच्या अंकात ‘ऊर्जामंत्र्यांची वादग्रस्त योजना : भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी?’ या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देताना दोतोंडे म्हणाले, राज्यात सुमारे १६ हजार फिडर्स आहेत. यापैकी अतिहानीत असलेल्या १३०० फिडर्सवरच फिडर मॅनेजर नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हे फिडर मॅनेजर नेमताना पारदर्शकता येण्याकरिता निविदा काढून नियुक्ती केली जाणार असून, फिडर्सच्या सध्याच्या महसुलाची ५ टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून भरण्याची तरतूद यात असेल. औरंगाबादमधील जीटीएलची थकबाकी वसूल करण्यात महावितरणसमोर कुठलीही अडचण नाही. महावितरणचे अपेक्षित येणे हे संरक्षित आहे. (प्रतिनिधी)
फिडर मॅनेजरची नियुक्ती प्रायोगिक तत्त्वावर
By admin | Updated: February 21, 2015 03:05 IST