Join us  

मुंबईच्या रक्षणासाठी 'रॉ'चे अनुभवी शिलेदार...जाणून घ्या कोण आहेत सुबोध जयस्वाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 7:06 PM

मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी

मुंबई - आज मुंबई पोलीस आयुक्त पद रिक्त झाले असून त्यापदी १९८५ च्या बॅचचे कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल हे रुजू  झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी जयस्वाल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर महाराष्ट्र पोलीस महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले असून  मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची बढती झाल्याने त्यांनी नवे पोलीस महासंचालक म्हणून नव्या कार्यालयात जावून पदभार स्वीकारला आहे. सुबोध जयस्वाल यांनी आज सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्तालयात येवून पदभार स्वीकारला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावर काम करण अत्यंत जिकरीचं असून त्या पदावर टीकून राहणं त्याहूनही कठीण. तरीदेखील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी काम करण्याची आकांक्षा असते. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलीस आयुक्त कोण होणार ? याबाबत बोलबाला सुरु होता. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, राज्य गुप्तचर आयुक्त संजय बर्वे, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. मात्र, केंद्रात प्रतिनियुक्तीवर काम केलेले सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती  निश्चित झाली आहे. जयस्वाल मुंबई विमानतळावर आज दुपारी दाखल झाले. राज्य सरकारने पत्राद्वारे जयस्वाल यांना महाराष्ट्रात पुन्हा काम करण्यात इच्छुक आहेत का ? अशी विचारणा केली होती. जयस्वाल यांनी देशभरात गाजलेला तेलगी घोटाळ्याचा तपास केला आहे. वरळीत मार्च २००६ साली भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची हत्या झाली त्यावेळी ते मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल कार्यरत होते. १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांचे गेल्यावेळी देखील मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चेत होते. तसेच ह्यावेळी देखील चर्चेत होते. मात्र, सेवाज्येष्ठतेनुसार जयस्वाल हे १९८५ सालचे अधिकारी असून त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला असला तरी त्यांची सेवानिवृत्ती देखील जवळ आली आहे. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पडसलगीकर यांना दोन महिन्यांसाठी काम करण्यास मिळणार आहे. मात्र. त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांचा महासंचालक पदाचा कार्यकाळ आणखी सहा महिने वाढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचा सकाळी नायगावच्या पोलीस मैदानावर निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला आहे. 

कोण आहेत सुबोधकुमार जयस्वाल ?

* १९८५ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी 

* देशभरात गाजलेल्या तेलगी घोटाळ्याचा तपासात प्रमुख भूमिका 

* २००६ दरम्यान मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते 

* सध्या ते केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर रॉ या गुप्तचर यंत्रणेत कार्यरत 

* स्टेट रिझर्व्ह पोलीस दलात देखील केले आहे काम 

* सप्टेंबर २०२२ पर्यंत आयपीएस म्हणून काम करण्याचा कार्यकाळ 

टॅग्स :पोलिसमुंबई