Join us

अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी वर्षभरात ४८ टक्के निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेचा सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बालसिंह चहल बुधवारी जाहीर करणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेचा सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बालसिंह चहल बुधवारी जाहीर करणार आहेत. मात्र कोविड काळात विकासकामांना खीळ बसली होती. त्यामुळे रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिन्या, उद्यान अशा विकासकामांवर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील तरतुदींपैकी ४८ टक्के निधी डिसेंबर अखेरीपर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासकामांसाठी ११ हजार ७६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र ३१ डिसेंबर २०२०पर्यंत यापैकी केवळ पाच हजार ७४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्या काळात याच कालावधीत ४६ टक्के निधी खर्च झाला होता. परंतु, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विकासकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सूट दिल्यामुळे विकास कर या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे.

डिसेंबर २०२०पर्यंत रस्ते वाहतूक आणि पूल विभागातील ६३ टक्के निधी खर्च झाला आहे. तर कोस्टल रोड प्रकल्पासाठी ७९ टक्के, पाणी प्रकल्पासाठी ३४ टक्के, आरोग्य विभागात ३३ टक्के अर्थसंकल्पीय तरतूद खर्च झाली आहे. तर कोविड काळात खर्च करण्यात आलेले १८०० कोटी रुपये आकस्मिक निधीतून खर्च करण्यात आले आहेत. तर पर्जन्य वाहिन्या विभागात ४४ टक्के, घनकचरा व्यवस्थापन २१ टक्के, मलनिस्सारण विल्हेवाट २८ टक्के, माहिती तंत्रज्ञान विभाग ३१ टक्के, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलात १५ टक्के निधी खर्च झाला आहे.

* विद्यमान आर्थिक वर्षात निश्चित केलेल्या २८,४४८ कोटी उत्पन्नापैकी डिसेंबर अखेरपर्यंत ११,६१६ कोटी अर्थात ४०.८३ टक्के महसूल जमा झाला आहे.

* डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कराचे केवळ ७३४.३४ कोटी उत्पन्न वसूल झाले आहे. तर जकातीपोटी नुकसानभरपाई स्वरूपात राज्य सरकारकडून ७३३९.१४ कोटी उत्पन्न मिळाले आहे.