Join us

महावितरणच्या अधिकाऱ्यांना महापौरांनी घेतले फैलावर

By admin | Updated: June 13, 2014 23:12 IST

महावितरणच्या सावळागोंधळापायी महानगरपालिका प्रशासन हैराण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विजेचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे.

वसई : महावितरणच्या सावळागोंधळापायी महानगरपालिका प्रशासन हैराण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विजेचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे महापौर नारायण मानकर यांनी अधीक्षक अभियंतासमवेत चर्चा केली. या चर्चेनंतर अधीक्षक अभियंता सोनावणे यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार परिसरात वीज भारनियमन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अधूनमधून वीजप्रवाह खंडीत होण्याचे प्रकारही वाढीला लागले आहेत. वसई-विरार शहरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मासवण व उसगाव या ठिकाणी महावितरणतर्फे अचानक शटडाऊन घेण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक भागात दोन ते तीन दिवस पाणी येत नसल्यामुळे नागरिकांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यावर त्वरीत उपाययोजना करण्याकरिता महापौर नारायण मानकर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत महापौरांनी अधिकाऱ्यांना त्वरीत योग्य ती कार्यवाही करा अन्यथा आम्हीही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आम्हालाही मर्यादा येतात. परंतु लोकांसाठी आम्ही मर्यादा ओलांडून दाखवू, असा गर्भित इशारा दिला.या बैठकीत अनेक नगरसेवकांनी महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले. या चर्चेनंतर अधीक्षक अभियंता सोनावणे यांनी त्वरीत तोडगा काढून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपमहापौर रुपेश जाधव, नितीन राऊत, सुदेश चौधरी, पंकज ठाकूर, भरत मकवाना, सभागृह नेते उमेश नाईक व रमेश घोरकना उपस्थित होते. (प्रतिनिधी)