मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणाला घ्यायचे आणि कोणाला थांबवायचे, असा यक्षप्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतावत असून त्यातून मार्ग काढण्यासाठी ते सहकारी नेते आणि दिल्लीशी चर्चा करीत आहेत, असे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले. 1 किंवा 3 डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सध्या 1क् जण मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळाचा आकार आघाडी सरकारइतका नसेल, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. आघाडी सरकारमध्ये 43 मंत्री होते. आता ही संख्या फार तर 32 ते 34 इतकी असू शकते. शिवसेना मंत्रिमंडळात येण्यास राजी झाली आणि इतर लहान मित्रपक्षांना वाटा देण्याचे ठरले तर भाजपातून मंत्री घेण्यास मर्यादा येणार आहे. मंत्रिपदासाठी मित्रपक्षांचाही दबाव वाढत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक आणि संधी कमी असल्याने मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागत आहे.
आगामी विस्तारात उर्वरित सर्व मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेला विस्तार आता करायचा आणि नंतर पुन्हा एक विस्तार करायचा असाही एक विचार आहे. तसे झाले तर काही इच्छुकांच्या नशिबी पुन्हा एक प्रतीक्षा येऊ शकते.
राज्य मंत्रिमंडळात सध्या विदर्भाचे दोन, मुंबई-ठाण्याचे चार, पश्चिम महाराष्ट्रातील दोन, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातील प्रत्येकी एक मंत्री आहेत. विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाडय़ाला मिळालेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईला आणखी किमान एक मंत्रिपद मिळावे,
अशी मुंबईतील भाजपा नेत्यांची अपेक्षा आहे. विदर्भाला आणखी
दोन ते तीन मंत्रिपदे दिली
जातील. (विशेष प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचाही वाटा वाढणार आहे. विभागीय, जातीय संतुलनाचा विचार करूनच विस्तार होईल. नागपूर बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, लातूर, मुंबई येथून एकापेक्षा अधिक इच्छुकांमधून कोणाला संधी द्यावी याचे आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे.