लोकमत न्यूज नेटवर्क
मराठी एकांकिकांच्या विश्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच एकांकिकांनी एन्ट्री घेतली आहे. या स्पर्धेत आता या पाच एकांकिकांचे ‘अस्तित्व’ पणाला लागणार आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या स्पर्धेसाठी सुचविलेला ‘हसू आणि आसू’ हा विषय आहे. हे या स्पर्धेचे यंदाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
‘अस्तित्व’ आणि ‘चार मित्र’, कल्याण यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींसोबत हौशी, तसेच व्यावसायिक रंगकर्मीसुद्धा आवर्जून सहभागी होत असतात. यावर्षी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत याचे प्रतिबिंब पडलेले दिसले. नाटक, चित्रपट व मालिका क्षेत्रातील राजेश देशपांडे, वर्षा दांदळे, क्षितिज झारापकर, प्रमोद शेलार आदी मंडळी या स्पर्धेत उतरलेली दिसून येत आहेत.
सध्याचा कोरोना प्रादुर्भावाचा काळ लक्षात घेता या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन घेण्यात आली. प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्यांच्या एकांकिका चित्रित करून मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण १८ एकांकिकांनी सहभाग घेतला होता. त्यातून निवड झालेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी १३ फेब्रुवारी रोजी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे रंगणार आहे.
चौकट:-
अंतिम फेरीतील एकांकिका...
‘फ्लाइंग राणी’ (अमर हिंद मंडळ), ‘आपुले मरण’ (सृजन द क्रिएशन), ‘खेळ’ (मॉर्निंग ड्रीम्स), ‘मी आहे म्हणून’ (अथर्व थिएटर्स) व ‘परास्त मनसुबे’ (अहिल्या थिएटर्स) या पाच एकांकिका या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.