Join us  

ग्राहक टिकवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून केबल चालकांची अस्तित्वाची लढाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 7:13 PM

कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील सर्व घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

खलील गिरकर

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील सर्व घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केबल व्यावसायिकांना देखील यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे. केबल व्यावसायिकांना आपले ग्राहक टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक ग्राहकांना केबलचे शुल्क देणे अशक्य झाल्याने केबल चालकांना स्वत:च्या खिशाला कात्री लावून ग्राहकांना सेवा देण्याची वेळ आली आहे. 

लॉकडाऊन कालावधीत घरी राहण्याची सक्ती असल्याने नागरिकांना कोरोनाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तवाहिन्या पाहण्याची व इतर वेळी मनोरंजनासाठी केबल सेवेवर अवलंबून राहावे लागले. मात्र या कालावधीत अनेकांच्या वेतनात कपात झाल्याने व अनेकांच्या रोजगारावर संक्रांत आल्याने ग्राहकांच्या हातात पैसा नसल्याने केबलचे शुल्क भरण्याकडे अनेकांनी टाळाटाळ केली. मात्र ग्राहकांकडून पैसा आला नसला तरी केबल ऑपरेटर ना मात्र प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला केबलचे शुल्क आगावू पध्दतीने भरणे भाग होते. त्यामुळे त्यांना या कालावधीत स्वत:च्या खिशातून पैसे भरुन ग्राहकांची सेवा सुरु ठेवावी लागली. 

शिव केबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील म्हणाले, ब्रॉडकास्टर्स जुन्या मालिका दाखवत असताना केबलचे शुल्क माफ करण्याची किंवा कमी करण्याची गरज होती मात्र दूरसंचार नियामक आयोगाकडे (ट्राई)  सातत्याने मागणी करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी केबल ऑपरेटरना व ग्राहकांना त्याचा आर्थिक फटका बसला. 

अनेक केबल चालकांनी शिलकीतील रक्कम वापरुन स्वत: शुल्क भरले तर ज्या ठिकाणी शुल्क भरणे अशक्य झाले तिथे फ्री टु एअर वाहिन्या दाखवल्या. मात्र कोणत्याही परिस्थितीत ग्राहक तुटु नये याची काळजी घेतली. खरे पाहता जुन्या मालिकांचे पुनर्प्रसारण केले जात असताना शुल्क माफ करण्याची किंवा कमी करण्याची गरज होती. मात्र ट्रायने त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी केला. 

महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष परेश तेलंग म्हणाले,  लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या कालावधीत 20 ते 30 टक्के ग्राहकांनी शुल्क भरले होते. अनलॉक सुरु झाल्यानंतर आता काही प्रमाण वाढले असून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र केबल ऑपरेटर ना या संपूर्ण कालावधीत मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून सरकार व ट्रायने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ग्राहक व ऑपरेटर दोघांना फटका बसला आहे. जुने कार्यक्रम पूर्ण रक्कम भरुन पाहावे लागले. 

जुने कार्यक्रम दाखवून पूर्ण शुल्क आकारले जात असल्याने केबल चालकांना व ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीत विनाकारण शुल्क भरावे लागले. आता मालिकांच्या चित्रिकरणाला प्रारंभ झाला असल्याने नवे एपिसोड पाहता येणे शक्य होणार असल्याने तेवढाच प्रेक्षकांना दिलासा मिळू शकेल. 

टॅग्स :डिजिटलमुंबई