Join us

भिवंडी मनपातील समित्यांचा वनवास संपला

By admin | Updated: August 24, 2014 01:34 IST

महापालिकेची स्थापना होऊन तब्बल 14 वर्षे उलटल्यानंतर अखेर विविध समित्या स्थापन करण्याला भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली.

भिवंडी : महापालिकेची स्थापना होऊन तब्बल 14 वर्षे उलटल्यानंतर अखेर विविध समित्या स्थापन करण्याला भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. परिवहन, बांधकाम, आरोग्य, शिक्षण यासाठी समिती गठित करण्याला मंजुरी देण्यात आल्याने शहरातील मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा वाढणार असून  वनवास संपुष्टात येणार असल्याची प्रतिक्रिया भिवंडीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पालिकेचा कारभार सुटसुटीत, पारदर्शक व सुविधायुक्त व्हावा, याकरिता नुकत्याच झालेल्या महासभेत विविध समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
भिवंडी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार सुरू आहे, असे बोलले जात असले तरी तत्कालीन सत्ताधारी व प्रशासन यांनी नियोजन न करता शहराची दुर्दशा केली आहे. शहरात बसेस सुरू करण्याच्या निमित्ताने अर्थसंकल्पात तरतूद करूनही परिवहन समितीची स्थापना करण्यात आली नव्हती. गुरुवारच्या महासभेत 12 सदस्यांची परिवहन समिती तर बांधकाम, आरोग्य, शिक्षण, वृक्ष प्राधिकरण  अशा 9 सदस्य असलेल्या समित्यांना मंजुरी देण्यात आली. महिला बालकल्याण समितीवरही सदस्य निवडण्यात आले. तसेच स्थायीच्या मुदत संपलेल्या 8 सदस्यांची नियुक्ती गट व पक्षीय गटनेत्यांनी केली. मात्र अजूनही दलित वस्ती सुधार समितीची निवड करण्यासाठी सत्ताधारी व प्रशासन पुढाकार का घेत नाही, असा प्रश्न नगरसेवक कमलाकर पाटील यांनी महासभेत उपस्थित केला.