पंकज राऊत, बोईसरशहराच्या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर मोटार वाहनांची संख्या भयानक वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्त्यांच्या कडाही फेरीवाल्यांनी व्यापल्याने तसेच पदपथाअभावी हजारो पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन अक्षरश: कसरत करावी लागते, तर बेशिस्त आणि बेदरकारपणे भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघातातही वाढ होऊन पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.बोईसर येथे बोईसर ते टॅप्स गेट, बोईसर ते ओव्हरब्रीज, नवापुर नाका ते एमआयडीसी तीन टाकी नाका, शिवमंदिर ते वंजारवाडा येथील रेल्वे फाटक इ. सर्व रस्त्यांवरील मागील काही वर्षापासून वाहतूक वाढली परंतु रस्ते तेच असून रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली तर नाहीच परंतु वाटेल तिथे पार्क करण्यात येणारी वाहनेही पादचाऱ्यांना अडथळा ठरून पादचाऱ्यांना सुरक्षित व तणावरहित वातावरणात ये-जा करता येत नाही. त्यामध्ये वयोवृद्ध, विद्यार्थी, लहान बालके व महिलांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पायी चालणे हे माणसांचे दळणवळणाचे प्राथमिक माध्यम समजले जाते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला रस्त्यावरून बिनधोकपणे चालता आले पाहिजे तो त्यांचा मूलभूत हक्कही आहे परंतु त्या हक्काविषयी नागरिकांमध्ये जागृतता कमी झाली तर संबंधित सर्व यंत्रणांमध्ये शिथिलता आल्याने पादचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळते. त्याकरीता जागृत नागरिकांनी पुढे येण्याची गरज बोलून दाखविली जात आहे.भविष्यात रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढतच जाणार असल्याने वाहनांच्या वाढीचा परिणाम म्हणून रस्ते अपघाताचे प्रमाण बेसुमार वाढणार हे निश्चित आणि स्वाभाविकच. त्या अपघातामध्ये पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. बोईसर रेल्वे स्थानकाकडे जाणारे दोनच मुख्य रस्ते असून ते वाहनांनी आणि फेरीवाल्यांनी व्यापल्याने पादचाऱ्यांना वाहनांचा स्पर्श नेहमीच होत असतो. त्यातच ओव्हरब्रिज व टॅप्स गेटपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. त्याला जरी गती सर्वांनी एकत्र येऊन दिल्यास रस्ता चौपदरीकरण झाल्यास पादचाऱ्यांना पदपथ उपलब्ध होऊन ते सुरक्षितपणे ये-जा करू शकतील. त्या गोष्टीला दोन-चार वर्षाचा अवधी लागण्याची शक्यता असल्याने पदपथाबाबत काहीतरी त्वरीत मार्ग काढणे गरजेचे आहे.
पदपथाअभावी कसरत सुरू
By admin | Updated: August 24, 2014 23:30 IST