Join us

बलात्कारी खुन्याची फाशी कायम

By admin | Updated: February 17, 2015 01:46 IST

बलात्कारानंतर अमानुष खून करणाऱ्या विरन ग्यानलाल रजपूत या मूळच्या मध्य प्रदेशातील आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम केली.

मुंबई : रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील कामठेकरवाडी या गावातील साडे तेरा वर्षांच्या एका शाळकरी मुलीचा बलात्कारानंतर अमानुष खून करणाऱ्या विरन ग्यानलाल रजपूत या मूळच्या मध्य प्रदेशातील आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम केली.आपली राक्षसी कामवासना भागविण्यासाठी शाळेतून एकट्या घरी जाणाऱ्या अश्राप व असहाय मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर तिचा अमानुष खून करणे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह खड्ड्यात पुरून टाकणे ही कृत्ये आरोपीच्या विकृत व अमानुष मानसिकतेचे द्योतक आहेत. केल्या कृत्याचा त्याला जराही पश्चात्ताप नाही व तो सुधारण्याचीही शक्यता नाही. असा आरोपी जिवंत राहणे समाजासाठी कायमचा धोका ठरणार असल्याने त्याला अजिबात दया दाखविता येणार नाही, असे न्या. विजया कापसे ताहिलरामाणी व न्या. इंदिरा कन्हैयालाल जैन यांच्या खंडपीठाने आपल्या ९३ पानी निकालपत्रात नमूद केले.कामठेकरवाडी येथे राहणाऱ्या व तेथून ४ कि.मी. अंतरावरील पेडाळी येथील शारदा विद्यामंदिर शाळेत इयत्ता ९वीत शिकणाऱ्या मुलीला १७ आॅक्टोबर २०१२ रोजी पळवून नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. नंतर ओढणीने गळा आवळून त्याने तिचा खून केला होता. नंतर आरोपीनेच दाखविलेल्या जागी नग्नावस्थेतील तिचे प्रेत कामठेकरवाडी फाट्याच्या पूर्वेकडील जंगलात खड्ड्यात पुरलेले मिळाले होते.ही मुलगी शाळा सुटल्यावर सायंकाळी नेहमीप्रमाणे चालत घरी चालली होती. आरोपी तिच्या पाळतीवर होता. मुलगी वेळेवर घरी आली नाही म्हणून वडिलांसह नातेवाइकांनी शोधाशोेध सुरू केली व मुलगी हरविल्याची फिर्यादही पाली पोलीस ठाण्यात नोंदविली. योगायोग असा की, फिर्याद नोंदवून घरी परत असता त्यांना वाटेत गावातील काही मुले भेटली. या मुलीला आपण शाळेतून येताना पाहिले व त्या वेळी लाल टी-शर्ट घातलेला एक अनोळली माणूस तिच्या पाठोपाठ चालत होता, असे या मुलांनी सांगितले. नंतर हा लाल टी-शर्टवाला इसम आवंढे गावात अंबा नदीकाठी पाले टाकलेल्या लमाणांच्या तांड्यावर आढळला. त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. एवढेच नव्हेतर त्याने मुलीचे प्रते आपण कुठे पुरून ठेवले आहे, हेही दाखविले.या प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता व सर्व परिस्थितीजन्य पुरावे होते. तरीही आरोपीला मयत मुलीसोबत शेवटचे पाहिले जाणे, आरोपीने स्वत: प्रेत कुठे ठेवले आहे ते दाखविणे, जेथे हा गुन्हा घडला तेथील माती आरोपीच्या पँटला चिकटलेली असणे, गुन्हा उघड होऊ नये यासाठी आरोपीने प्रेत पुरून टाकणे इत्यादी सप्रमाण सिद्ध झालेल्या घटनाक्रमावरून हा बलात्कार व खून आरोपीशिवाय अन्य कोणीच केला नाही, हेच सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले. गुन्ह्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत खटला संपवून माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीस विविध गुन्ह्यांसाठी फाशीसह इतर शिक्षा सुनावल्या होत्या. त्याविरुद्धचे अपीलही उच्च न्यायालयाने त्यापुढील सात महिन्यांत निकाली काढले. (विशेष प्रतिनिधी)न्यायाधीश, प्रॉसिक्युटरचा पहिलाच खून खटलाउच्च न्यायालयात झालेल्या या अपिलाच्या कामाचे वेगळेपण असे की खंडपीठावरील एक न्यायाधीश न्या. कु. जैन आणि अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेट या दोघांनीही चालविलेला/ ऐकलेला हा पहिलाच खून खटला होता. आधी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या असलेल्या न्या. जेन यांची दीडच महिन्यापूर्वी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर झालेल्या अ‍ॅड. सेट यांनी त्याआधी खासगी वकील म्हणूनही कधी खुनाचा खटला चालविला नव्हता. आरोपीसाठी सरकारने नेमलेले अ‍ॅड. विनीत कुलकर्णी यांनी काम पाहिले. दोन्ही वकिलांनी केलेली मेहनत व अभ्यापूर्ण युक्तिवादांचे न्यायाधीशांनी आवर्जून कौतुक केले.