Join us  

अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

By मनोहर कुंभेजकर | Published: March 27, 2024 7:35 PM

मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या तयारी साठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी शनिवार 9 मार्च रोजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा शाखांमधील भेटींमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहिर केली होती. आज सकाळी ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यातील 17 लोकसभा उमेदवारांची यादी जारी केली,यामध्ये या मतदार संघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

या मतदार संघात आज फेरफटका मारला असता, शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ते होळी निमित्त आपल्या गावी कोकणात गेले असल्याने शिवसैनिकांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या.

 10 एप्रिल पासूनच या मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या तयारी साठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. या मतदार संघातील  जोगेश्वरी पूर्व,गोरेगाव आणि दिंडोशी,वर्सोवा,अंधेरी पश्चिम,अंधेरी पूर्व या सहा विधानसभा क्षेत्राच्या आणि येथील शिवसेना शाखा शाखांमधून कीर्तिकर यांच्या बैठका संपन्न झाल्या.मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समन्वयक व आमदार विलास पोतनीस,शिवसेना नेते-विभागप्रमुख अँड.अनिल परब व शिवसेना नेते-विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

स्वतः अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.मला कदाचित घरातून राजकीय साथ नाही,मात्र मतदार संघातील शिवसैनिकांची साथ माझ्यासाठी मोलाची असून त्यांच्या जोरावर मी येथून खासदार म्हणून विजयी होईल अशी साद ते शिवसैनिकांनाघालत आहे.

शिवसेना नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई हे सुद्धा प्रचारात उतरले असून त्यांनी सुध्दा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची गोरेगाव पश्चिम जवाहर नगर हॉल मध्ये बैठक घेतली होती.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी दि,10 मार्च रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले तरीही येथील जनता व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत ठामपणे उभे आहेत. यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व विधानसभेतून अमोल कीर्तीकर यांना भरघोस मताधिक्य मिळेल अशी ग्वाही आमदार विलास पोतनीस यांनी लोकमतला दिली.

जिवाची बाजी करून "आपल्या अमोलला" लोकसभेवर निवडून आणायचेच असे एकमेव लक्ष समोर ठेवून येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे अशी माहिती शिवसेना नेते अँड.अनिल परब व शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४शिवसेनाराजकारणमुंबई