नवी मुंबई : निवडणुकीमध्ये कोणी काम केले नाही याविषयी कोणाला दोष देऊ नका. प्रत्येकाने पराभवाविषयी आत्मचिंतन करावे. भविष्यात विधानसभा व महापालिकेची निवडणूक आहे. खचून न जाता जोमाने कामाला लागावे. स्वत: प्रत्येक गाव व विभागांना भेट देऊन नागरिकांची भूमिका जाणून घेणार असल्याचे मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसने आज कोपरखैरणेतील रा. फ. नाईक सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, फक्त ठाण्यामध्ये पराभव झाला नसून पूर्ण देशात काँगे्रस व राष्ट्रवादीला पराभवास सामोरे जावे लागले आहे. संजीव नाईक यांच्या विजयासाठी कोणी मदत केली, कोणी केली नाही यावरून कोणालाही दोष देवू नका. पराभवासाठी कोणाला जबाबदार धरणार नाही. प्रत्येकाने आत्मचिंतन करावे. पराभवाबाबत कोणी भाष्य केले तर उथळ होवून प्रत्युत्तर देवू नका असे त्यांनी बजावले. येत्या वर्षभरात विधानसभा आणि पालिका निवडणूक आहे. त्याकरिता इतिहासाचा बोध घेवून पुन्हा झेप घेण्यासाठी तयार राहा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. पराभवाने खचणारे आपण नाही. कोणी स्वत:ला दोषी समजू नये व मी पण कोणाला दोषी समजणार नाही. पुढचा कालखंड हा आपलाच असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. लवकरच प्रत्येक विभाग, गाव यांना आपण कार्यकर्त्यांसह भेटी देणार आहोत. त्यामध्ये लोकांना काय हवे आहे ते जाणून घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी संजीव नाईक यांनी भविष्यात देखील आपण कार्यकर्त्यांबरोबरच राहणार असल्याचे सांगितले. या बैठकीस आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, जिल्हा अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रत्येकाने पराभवाचे आत्मचिंतन करावे
By admin | Updated: May 19, 2014 05:21 IST