Join us
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी ३ कोटी भारतीयांना लागण

By admin | Updated: July 28, 2014 01:58 IST

हीपॅटायटिस या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने अनेक रुग्णांना सुरुवातीला हा आजार झाल्याची कल्पना येत नाही.

मुंबई : हीपॅटायटिस या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने अनेक रुग्णांना सुरुवातीला हा आजार झाल्याची कल्पना येत नाही. मात्र हा आजार पुढच्या पातळीवर गेल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जगभरात मृत्यू होण्याच्या १० कारणांमध्ये आठव्या क्रमांकावर हीपॅटायटिस असल्याचे जागतिक पातळीवर झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. भारतामध्ये दरवर्षी सुमारे ३ कोटी जनतेला हीपॅटायटिसची लागण होते. जगभरामध्ये १२ व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा मृत्यू हा हीपॅटायटिसमुळे होतो. या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे याला सायलंट किलर असे म्हटले जाते. हीपॅटायटिस म्हणजे यकृताला दाह होतो. यकृताला दाह होत असताना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत़ परिणामी यावर प्राथमिक अवस्थेत असताना उपचार होत नाही. काही काळाने यकृतदाह वाढला गेल्यास काही जणांचे यकृत कडक व्हायला लागते, तर काही जणांना यकृताच्या कर्करोगाची लागण होते. भारतामध्ये ४० वर्षांखालील दोनतृतीयांश जणांना हीपॅटायटिसचा संसर्ग झालेला आहे. प्राथमिक पातळीवर या आजारामध्ये उपचार झाले नाहीत, तर पुढे रुग्णांची प्रकृती आणखीनच बिघडत जाते. काही जण बेडरिडन होतात. २ टक्के भारतीयांना हीपॅटायटिस बी आणि सी चा संसर्ग झालेला आहे. मात्र यामधील अनेकांना आपल्याला हीपॅटायटिस असल्याचे माहीत नाही. यामुळेच या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्लोबल रुग्णालयाचे डॉ. समीर शहा यांनी सांगितले.हीपॅटायटिस हा आजार प्राथमिक स्वरूपाचा असताना त्यावर उपचार झाल्यास पुढे कर्करोगासारखे होणारे आजार टाळता येऊ शकतात. हीपॅटायटिस हा आजार वाढत गेल्यास शेवटचा उपाय म्हणजे यकृत प्रत्यारोपण हा आहे. हा आजार टाळता येऊ शकतो. हीपॅटायटिस टाळण्यासाठी उपलब्ध असलेली लस घेतली पाहिजे. याचबरोबरीने दूषित अन्न खाणे टाळले पाहिजे. रक्तामधून देखील संसर्ग होऊ शकतो. यामुळे तपासलेले रक्तच वापरले पाहिजे़ या गोष्टी पाळल्यास हीपॅटायटिस होण्याचा धोका टळू शकतो, असे डॉ. शहा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)