नवी मुंबई : शहरातील प्रत्येक तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी तलावांची अत्यंत आवश्यकता असून कोणत्याही स्थितीमध्ये एकही तलाव बुजविला जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोपरखैरणे सेक्टर १९ मधील जुना गणेश विसर्जन तलाव बुजवून तेथे उद्यान व वाहनतळ करावा असा विषय नगरसेवक शिवराम पाटील यांनी स्थायी समितीमध्ये मांडला होता. सदर तलावांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तलावात गाळ साचला आहे. तलाव बुजविण्यात यावा, तसे करता येत नसेल तर त्याचे काय करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विजयानंद माने यांनीही तलावाच्या समस्येविषयी वस्तुस्थिती सांगितली. नैसर्गिक तलाव बुजविता येतो का, बुजविता येत नसेल तर त्याची देखभाल कशी करायची याविषयी प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली. अनंत सुतार यांनी अद्याप सर्व तलावांवर सुरक्षा रक्षक नसल्याविषयी नाराजी व्यक्त केली. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी कोपरखैरणेमधील तलाव नैसर्गिक आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी तलावांची अत्यंत आवश्यकता आहे. काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी मुरण्यास जागाच नाही. नियमाप्रमाणेही तलाव बुजविता येत नसून त्यांचे सुशोभीकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
प्रत्येक तलावाचे होणार सुशोभीकरण
By admin | Updated: November 8, 2014 00:58 IST