Join us

बोर्डीत दररोज १४ तास वीज गुल

By admin | Updated: October 8, 2014 00:55 IST

चिकूच्या बागा निसर्गरम्य समुद्रकिनारा, कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र, आदिवासी संस्कृती अशा विविधतेसाठी डहाणू प्रसिद्ध आहे

बोर्डी : चिकूच्या बागा निसर्गरम्य समुद्रकिनारा, कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र, आदिवासी संस्कृती अशा विविधतेसाठी डहाणू प्रसिद्ध आहे. मात्र, सध्याच्या काळात तालुक्यात वीजेचा वारंवार लपंडाव सुरू असल्याने भारनियमनाचा तालुका अशी त्याची नवीन ओळख निर्माण होताना दिसते.डहाणूत भारनियमनाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसते आहे. बोर्डी परिसरातील नरपड, कोसबाड आणि बोर्डी या डहाणू महावितरण कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील गावात प्रतिदिन किमान चार तर कमाल चौदा तासांचे भारनियमन होते आहे. तांत्रिक बिघाड, वीजेचा वारंवार लपंडाव यांमुळे यात अधिक तासांची भर पडते. तर दुसरीकडे या वारंवार होणाऱ्या वीजेच्या लपंडावामुळे अनेक घरगुती उपकरणे निकामी झाली आहेत. ऐन उन्हाळ्यात पहाटे, भर दुपारी आणि रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या या भारनियमनाचा सर्वाधिक फटका तान्ही मुलं, गर्भवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. तर मत्स्य, कृषी व्यवसाय, डायमेकींग, हॉटेल्स आदी व्यवसायांना आर्थिक झळ बसली आहे. बोर्डीतील पर्यटन डबघाईला येण्याची भीती व्यक्त होत आहे. श्रावण मासातील सण, गोपाळकाला, गणपती तसेच नवरात्रोत्सवादरम्यान भारनियमनामुळे नागरीक संतप्त झाले आहेत. वेळोवेळी रस्त्यावर उतरून याचा निषेधही केला जातो आहे. मात्र, तरीही परिस्थितीत काही फरक पडताना दिसत नाही. आठवड्यापूर्वीच बोर्डीतील महावितरणचे कार्यालय फोडून जमावाने कायदा हाती घेण्याचा प्रकार घडला होता. (वार्ताहर)