Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानक पूरमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचत आहे. मात्र सँडहर्स्ट रोड रेल्वे ट्रॅकच्या खाली मायक्रो टनेलिंग पद्धतीने ...

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचत आहे. मात्र सँडहर्स्ट रोड रेल्वे ट्रॅकच्या खाली मायक्रो टनेलिंग पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन मार्ग खुला झाला आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात सँडहर्स्ट रोड रेल्वे परिसरात पाणी तुंबले नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

दक्षिण मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानकानजीकच्या परिसरात दरवर्षी अतिवृष्टीमुळे पाणी साचून रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अभियंत्यांनी व मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे अभ्यास केला. त्यानुसार फक्त नाल्यांवर अवलंबून न राहता, ‘रेल्वे ट्रॅक’च्या खाली ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मार्च २०२१ पासून हे काम हाती घेण्यात आले. त्यात ४१५ मीटर लांबीची व १,८०० मिलीमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी ही अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून व ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा न येता कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय काम करता आले. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे.

असे झाले सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानक पूरमुक्त

* येथील पर्जन्यजल वाहिनी पालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या पुढील भागात २५ मीटर लांबीची एक अतिरिक्त ‘बॉक्स ड्रेन’ पालिकेच्या वतीने टाकण्यात आली आहे.

* केवळ चार महिन्यांच्या कालावधीत एकूण तब्बल ४४० मीटर लांबीच्या व दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले.

* या ठिकाणी सर्व उपयोगिता सेवांना कोणताही धोका न पोहोचविता, २.१ मीटर बाय २.१ मीटर आकाराची पर्जन्यजल पेटिका वाहिनी (बॉक्स ड्रेन) दोन महिन्यात बांधून जून २०२१ रोजी हे काम पूर्ण करण्यात आले.

* मॅलेट बंदर जंक्शनवरील २२०० मिमी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिनीला सदर पेटिका वाहिनी जोडण्यात आली आहे. परिणामी पी डिमेलो मार्गावरील पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासह सँडहर्स्ट रेल्वेस्थानकावर पावसाळी पाणी साचण्याची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.