लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर, उपनगरातील थंडीचे प्रमाण आता कमी होत आहे. तरीदेखील येथील वायू प्रदूषणाचा त्रास कायम आहे. आजही मुंबईतील मालाड, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि कुलाबा येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावलेला आहे. हवेची गुणवत्ता मोजणा-या सफर या यंत्रणेकडील माहितीनुसार, मालाड आणि नवी मुंबई येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल इतर परिसरांमधील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला आहे.
येथील धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धुरक्यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. पीएम २.५ (पार्टीक्युलेट मॅटर पोल्युटंट) या कणांची पातळी सर्वाधिक असल्याचे आढळून आली आहे. पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात. ते सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. प्रदूषकांमुळे फुप्फुसांचा संसर्ग, दमा, श्वसन संस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात. पीएम. २.५ कमी दृश्यमानता आणि धुरक्यांचंही कारण ठरते. दरम्यान, कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात लॉकडाऊनदरम्यान हवा समाधानकारक नोंदविण्यात आली. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणाचा स्तर वाढू लागला आहे. शिवाय तर बीकेसी, कुर्ला, चेंबूरनंतर प्रदूषणाचा मोर्चा खारघर, तळोजा, पनवेलकडे वळला आहे. येथील परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण नोंदविण्यात येत आहे.
--------------
- २०१९ साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल १७ लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.
- प्रदूषणात इन डोअर आणि आऊट डोअर प्रदूषणाचा समावेश आहे.
- खुल्या जागेवरील प्रदूषणामुळे ९ लाख नागरिकांचा मृत्यू झाला.
- बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे ६ लाख नागरिकांचा मृत्यू झाला.
- बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण हे ६४.२ टक्क्यांनी घटले.
- बाहेरील प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे ११५.३ टक्क्यांनी वाढले.
- हवा प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ७० लाख लोक मृत्यू पावतात.
- महाराष्ट्रात हवा प्रदूषणामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या १.८ लाख आहे.