Join us  

गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यातही ‘ती’ कोविड सेंटरमध्ये बजावते सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 7:08 AM

निर्मल केअरअंतर्गत मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये १५ जूनपासून ऑपरेशन हेड म्हणून त्या रुजू झाल्या. कल्याणहून लोकलने सेंटर गाठायचे. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी पुन्हा लोकलच्या गर्दीतून घर गाठायचे

मनीषा म्हात्रेमुंबई : गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात डोहाळे पुरवून घेण्याच्या आणि आराम करण्याच्या दिवसांत डॉ. सरिता दत्तात्रय बांबळे मात्र सहा ते सात पीपीई किट घालून मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये सेवा बजावत आहेत. रुग्ण सेवा बजावताना त्यांना दोन वेळच्या जेवणाचाही विसर पडताे.

डॉ. सरिता या कल्याण परिसरात पती, सासू आणि साडेसहा वर्षांच्या मुलीसोबत राहतात. पतीही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या मुलीला नातेवाइकांकडे ठेवले. अशातच डॉ. सरिता यांना त्या गर्भवती असल्याचे लक्षात आले. सगळेच आनंदात होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात घरी बसणे त्यांना अस्वस्थ करत होते. दुसरीकडे कोविड सेंटरसाठी डॉक्टरांची वानवा असल्याने वैद्यकीय सेवेप्रति असलेले प्रेम आणि जबाबदारीमुळे त्यांनी त्याही अवस्थेत कोविड सेंटरमध्ये काम करण्याचे ठरविले. घराच्यांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाल्याचे त्या सांगतात.

निर्मल केअरअंतर्गत मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये १५ जूनपासून ऑपरेशन हेड म्हणून त्या रुजू झाल्या. कल्याणहून लोकलने सेंटर गाठायचे. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी पुन्हा लोकलच्या गर्दीतून घर गाठायचे, असा त्यांचा सुरुवातीचा दिनक्रम हाेता. मात्र रात्री-अपरात्री रुग्णाला गरज पडेल म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आणि आठवड्यातून एकदा मुलीला पाहण्यासाठी त्या घरी जाऊ लागल्या. मुलीला बघणेही लांबूनच. ९ महिने उलटत आले त्यांनी अजून मुलीला जवळ घेतलेले नाही. कोविड सेंटरमध्ये २७५ खटांची क्षमता असताना ३००हून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळे नर्सिंग रूमही रुग्णांसाठी खुले करण्यात आले. रुग्णांबरोबर येथील अन्य डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची जबाबदारीही सरिता यांच्या खांद्यावर आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना घरी असल्यासारखे वाटावे म्हणून गणेशोत्सवही येथे साजरा करण्यात आला. तर दिवाळीत रांगोळी काढण्यात आली हाेती. सरिता सांगतात, मी फक्त माझे कर्तव्य करते. जर मी घरी बसले तर माझ्या शिक्षणाचा क़ाय उपयोग? येथील प्रमुख डॉ. निर्मल जैन यांच्या प्रोत्साहनामुळे सर्व काम शक्य होत आहे.

...आणि चक्कर येऊनही पुन्हा उभीn रुग्णाचा वाढता ताण, बेडही भरलेले. त्यात  तिसरा महिना सुरू असताना त्या चक्कर येऊन कोसळल्या. अशातच कोरोना रुग्ण उपचारांसाठी आला. बेड मिळत नाही म्हणून नागरिकांचा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी थाेडे बरे वाटताच स्वत:च्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत त्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांनी अन्य ठिकाणी रुग्णासाठी बेड उपलब्ध करून दिला.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या