मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हाडा प्राधिकरणाला भेट देत असल्याने अधिकाऱ्यांच्या दृष्टीने गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण होता. इतका की त्यांनी मज्जाव केलेल्या आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या दलालाचा किमान आजच्या दिवशी तरी परिसरातील प्रवेशाला अटकाव करण्याची खबरदारी घेण्यासही ते विसरून गेले होते. शहिदांच्या विधवांच्या नावे आणि एकाच पत्त्यावर शेकडो अर्ज करून घरे हडप करणारा शशी कदम मुख्यमंत्र्यांच्या स्वागताआधीपासून ते सायंकाळपर्यंत म्हाडात राजरोसपणे फिरत आपली कामे करून घेत होता. पणन विभागासह, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर आणि कॅन्टीनमध्ये बसून होता. या भागात विविध ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची त्याला काहीच फिकीर नव्हती.घर मिळवून देणे आणि प्रलंबित कामे करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना गंडविणाऱ्या दलालांच्या विळख्यात म्हाडा पुरते अडकले आहे. त्यातून म्हाडाला बाहेर काढण्याची मानसिकता राज्यकर्ते, अधिकाऱ्यांत आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. शशी कदम याच्याविरोधात शहीद विधवांच्या नावे घर मिळवून दुसऱ्यांना विकणे, आणि आणि एकाच पत्त्यावर विविध नावाने अर्ज करून तब्बल ४२१ घरे मिळविल्याबाबत गेल्या वर्षी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पणन विभागात त्याचे छायाचित्र लावून त्याच्यापासून सावध राहण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आलेले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच तो व अन्य दलालांचा वावर सुरू झाला. नव्या सरकारने तब्बल १५ महिने रिक्त असलेल्या दक्षता विभागाच्या प्रमुखपदी वादग्रस्त आयपीएस अधिकारी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीबाबतही सर्वसामान्यांत साशंकता निर्माण झालेली आहे. गुरुवारच्या भेटीत मुख्यमंत्री प्राधिकरणाच्या कामकाज, प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र तासाभराच्या अवधीत त्यांनी धारावी आणि बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळीही म्हाडात दलालाचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2015 00:43 IST