अनुज अलंकार ल्ल मुंबईसलमान खान केवळ एक कलाकार नाही, तर त्याची गणना ज्याच्या चित्रपटावर कोट्यवधी रुपये लावले जातात अशा सुपरस्टारमध्ये केली जाते. स्टारडम व बॉक्स आॅफिसवरील त्याची पकड कधीच शिथिल होत नाही, कधीच त्याच्या यशाबद्दल शंका उपस्थित केली जात नाही. सलमानसारख्या मोठ्या ताऱ्यांच्या चित्रपटावर जसे कोट्यवधी रुपये लावले जातात, तशीच त्यांच्या चित्रपटावरील जोखीमही जास्त असते. यामुळेच सलमान खान तुरुंगात जाणार म्हटल्यानंतर त्याच्या चित्रपटांचे भविष्य टांगणीला लागून चित्रपट निर्मात्यांचे प्राण कंठाशी आले आहेत.आजमितीस सलमानच्या नावावर तीन चित्रपट येऊ घातले आहेत. त्यात ‘राजश्री’चा ‘प्रेम रतन धन पायो’ व कबीर खान यांचा ‘बजरंगी भाईजान’ आणि करण जौहरच्या कंपनीच्या ‘शुद्धी’चा समावेश आहे.बजरंगी भाईजानचे चित्रीकरण सलमानने अलीकडेच काश्मीरला जाऊन पूर्ण केले आहे, तर राजश्रीच्या चित्रपटाचे एक आठवड्याचे शूटिंग बाकी आहे. बजरंगी भाईजानचे पोस्ट प्रोडक्शन काम म्हणजेच एडिटिंग व डबिंग चालले आहे. तर राजश्रीच्या चित्रपटाचेही एडिटिंग चालले आहे. दोन्ही चित्रपटांसाठी सलमानचे डबिंग बाकी आहे. सलमान मे महिन्यात बजरंगी भाईजान व जुलै महिन्यात राजश्रीच्या चित्रपटाचे डबिंग करणार होता. बजरंगीच्या निर्मात्याला प्रसिद्धीआधीच नफा ९० कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा बजरंगी भाईजान या चित्रपटाशी इरॉससारखे मोठे कार्पोरेट घराणे जोडले गेले आहे. कबीर खानबरोबर सलमान खान स्वत:ही या चित्रपटाचा निर्माता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इरॉसशी या चित्रपटाचा सौदा १३० कोटी रुपयांना झालेला आहे. यात सॅटेलाइट अधिकारही समाविष्ट आहेत. याचाच अर्थ असा की हा चित्रपट प्रसिद्ध होण्याआधीच कबीर खान यांनी ४० कोटी रुपये कमावले आहेत. राजश्रीच्या निर्मात्याला नफा राजश्रीच्या चित्रपटाशी स्टारफॉक्ससारखा ग्रुप जोडला गेला आहे. या चित्रपटाचा सौदा १०० कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे. म्हणजेच या चित्रपटातून राजश्रीला प्रसिद्धीआधीच ३० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हे दोन्हीही चित्रपट सलमान खानचे आहेत. हे लक्षात घेतले तर या चित्रपटांचे उत्पन्न १५० कोटी रुपयापेक्षा जास्त असेल असा कयास आहे. करण जौहर अडकलाच नाहीकरण जौहरच्या ‘शुद्धी’ चित्रपटात अगोदर मुख्य कलाकार - हीरो हृतिक रोशन होता. नंतर सलमान खान आला. याचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे. (करण मल्होत्रा यांनीच हृतिक व संजय दत्त यांच्या भूमिका असणारा अग्निपथ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.) याचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार असून, २०१६ च्या दिवाळीत हा चित्रपट रिलीज होणार होता. या चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झालेलेच नाही. फारशी जोखीम नाही एका दृष्टीने सलमान खानच्या चित्रपटांचा विचार केल्यास त्याच्यावर ही जोखीम फारशी नाही. बजरंगी भाईजान व प्रेम रतन धन पायो या दोन्ही चित्रपटांचे एकूण बजेट २०० कोटी रुपयांच्या आत असून, शूटिंग पूर्ण झालेले असल्याने निर्मात्यांचा धोका बराच कमी झाला आहे. चित्रपट तज्ज्ञ विनोद मीरानी यांच्या मते सलमान खान तुरुंगात गेला तरीही त्याच्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे निर्मात्यांना जोरदार नफा मिळेल. दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण राजश्री फिल्मच्या चित्रपटाचे बजेट ७० कोटींचे असून बजरंगी भाईजान हा चित्रपट ९० कोटी रुपयांचा आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत. बजरंगी भाईजान हा चित्रपट जुलै महिन्यात ईदच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार असून, प्रेम रतन धन पायो हा चित्रपट दिवाळीला प्रसिद्ध होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही चित्रपटांचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे.
शिक्षेनंतरही निर्माते फायद्यातच
By admin | Updated: May 7, 2015 04:27 IST