Join us

सुरक्षित, दर्जेदार इलेक्ट्रिक साधनांच्या निर्मितीवर कंपन्यांनी भर द्यावा - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:55 IST

इलेक्ट्रिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेची सर्व मानके आणि दर्जा टिकवण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

मुंबई : इलेक्ट्रिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेची सर्व मानके आणि दर्जा टिकवण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. मुंबईमध्ये पॉवर केबल अलायन्सची स्थापना करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष देसाई बोलत होते. यावेळी पॉवर केबल अलायन्सचे देशभरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इलेक्ट्रिक वस्तू अधिक सुरक्षित करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. असुरक्षित इलेक्ट्रिक उपकरणामुळे किंवा त्रुटीमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. भारतात विजेचा धक्का लागून किंवा अपघात होऊन दिवसाला 60 हून अधिक व्यक्तींचे बळी जात आहेत. सदोष वीज वाहिन्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत, यातून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. हे टाळण्यासाठी पॉवर केबल अलायन्स व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दर्जेदार उत्पादने तयार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सुभाष देसाई यावेळी म्हणाले.

वीजपुरवठा व उत्पादन कंपनी प्रतिनिधींच्या याबाबत काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी राज्य शासन तयार आहे. खासगी कंपन्यांसोबत बैठक घेण्याची तयारी सुभाष देसाई यांनी यावेळी दर्शविली. औद्योगिक वसाहतीमध्ये आगीच्या घटना टाळण्यासाठी उद्योग विभागाने उद्योगांना फायर एनओसी देण्यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून याबाबत कुठलीही तडजोड केली जात नसल्याचेही सुभाष देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई