Join us  

मुंबई मेट्रोच्या संचलन, व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 5:15 AM

व्यवसाय आणि वेळेवर संचलन ही महत्त्वाची जबाबदारी पेलण्यासाठी महा मुंबई मेट्रो आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडची (एमएमएमओसीएल) स्थापना नुकतीच करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशातील १४ मेट्रो मार्गिकांचा प्रचंड व्याप, व्यवसाय आणि वेळेवर संचलन ही महत्त्वाची जबाबदारी पेलण्यासाठी महा मुंबई मेट्रो आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडची (एमएमएमओसीएल) स्थापना नुकतीच करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीचया कंपनीच्या स्थापनेस मान्यता दिली.ही कंपनी म्हणजे एक स्वायत्त संस्था असेल. तिचे अध्यक्ष म्हणून प्राधिकरणाचे महानगर आयुक्त नियुक्त असतील. नवीन कंपनीतील १,१०० पदे भरण्यासाठी प्राधिकरणाने अर्ज मागविले आहेत. व्यवसाय, देखभाल आणि संचलनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास प्राधिकरणाला जूनमध्ये केंद्र सरकारनेही अनुमती दिली.वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयातून नव्या कंपनीचा कारभार चालेल. सर्व कॉरिडॉरचे संचलन आणि देखभाल एकाच प्राधिकरणाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. या कंपनीचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालकांकडे असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)सारख्या सार्वजनिक संचालित कंपन्यांप्रमाणेच या कंपनीचे कामकाज आय.ए.एस. दर्जाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी करतील.भूमिगत मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो - ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) एमएमएमओसीएलच्या नियंत्रणाखाली आणली जावी यासाठीही महाराष्ट्र सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे. सध्या या मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत आहे. हे महामंडळ भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त भागीदार कंपनी आहे. मुंबई मोनोरेलचे संचलनसुद्धा याच कंपनीकडून केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले की, प्राधिकरणांतर्गत नवी कंपनी स्थापन केली जाईल. मेट्रोची सर्व कामे हाती घेण्यात येतील. तिकिटाच्या व अन्य उत्पन्नातून कंपनी चालविली जाईल.आरे कॉलनीतील मेट्रो भवनमधून सर्व मेट्रो मार्गांचे संचलन व नियंत्रण करण्यात येईल.