Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय शाळांसाठी राज्यात स्वतंत्र बोर्ड स्थापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 05:33 IST

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सदिच्छा भेट घेतली

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकावा, यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र असे बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे.मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी आंतरराष्ट्रीय शाळांबाबत माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमधूनच आंतरराष्ट्रीय शाळांची निवड करण्यात येणार आहे. या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या इंग्रजी माध्यमाच्या नसतील. इंग्रजी हा महत्त्वाचा विषय निश्चित असेल, पण इतर पूर्ण शिक्षण हे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलगू, कानडी माध्यमांच्या शाळांची निवड केली जाणार आहे.आंतरराष्ट्रीय शाळा बोर्डास पूर्णत: स्वायत्तता दिली जाईल आणि गुणवत्तेसाठीचे सगळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. या शाळांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती लवकरच नियुक्त करण्यात येईल.मुंबई विद्यापीठाच्या नव्याने नियुक्त झालेल्या कुलगुरूंनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या वेळी मुंबई विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांनीही कुलगुरूंच्या अभिनंदन करत, त्यांना ‘यू कॅन विन’, ‘तुकाराम दर्शन’ ही पुस्तके भेट दिली. प्रलंबित निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी प्राधान्य देणार असून नॅक, अ‍ॅक्रिडेशनची पूर्तता करणे, विद्यापीठातील रिक्त जागा भरणे, कामाची विभागणी करणे आदी कामांचा निपटारा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.