Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी मुंबईत समूहसाधन केंद्रनिहाय गटांची स्थापना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची माहिती संकलित करून त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची माहिती संकलित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने स्थलांतरित, भटके, वंचित घटकातील बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी राज्यभरात शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. मुंबईतही पालिका शिक्षण विभाग, उपसंचालक कार्यालयातील शाळांचे शिक्षक, अधिकारी, समग्र शिक्षाचे समन्वयक विविध वस्त्या, झोपडपट्ट्या, फुटपाथ, रेल्वेस्थानके, वस्तू विकणारी, भीक मागणारी बालके यांच्यामध्ये फिरताना सध्या दिसत आहेत. त्यांच्या पालकांकडे मुलांच्या शिक्षणाची चौकशी करून त्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रबोधन करताना शिक्षक दिसत आहेत. त्यामुळे ही मोहीम मुंबईत प्रभावीपणे राबविली जात आहे.

मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत समूहसाधन केंद्रनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. समग्र शिक्षा विषयतज्ज्ञ आणि त्यांच्या समूहसाधन केंद्रातील शिक्षक याप्रमाणे गट तयार करण्यात आले आहेत. शाळेच्या भोवतालचा १ ते ३ किमीचा परिसर ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत आहे. मुंबई उपसंचालक कार्यालयातील समग्र शिक्षाची पथके ही ज्या ठिकाणी अडचणी आहेत अशा ठिकाणी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेत असल्याची माहिती शाळाबाह्य तसेच मुंबई विद्याप्राधिकरणाची टीम सर्व रेल्वेस्थानक व त्याभोवतालचा १०० मीचा परिसर या ठिकाणातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेत आहे. १५ मार्च नंतर सगळ्यांकडून शाळाबाह्य स्थलांतरित मुलांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये बालरक्षक विशेष कार्यरत असून ते या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती जिल्हा बालरक्षक समन्वयिका वैशाली शिंदे यांनी दिली.

पालिका शिक्षण विभागाकडून ही महापालिका स्तर समिती, वॉर्ड स्तर आणि केंद्रस्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहआयुक्तांपासून ते बालरक्षक प्रतिनिधी, केंद्रीय मुख्याध्यापक, स्थानिक नगरसेवक, आरोग्य सेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या आणि अशा अनेक प्रतिनिधींचा समावेश आहे. प्रत्येक स्तरावरील समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिव यांच्यावर या मोहिमेची मुख्य जबाबदारी असणार आहे. मात्र कोरोना संकटामुळे यावर्षी एक तर शाळाच भरल्या नाही. दुसरे म्हणजे शेकडो मुले शाळांमध्ये दाखलच झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे ही शोधमाेहीम राबवताना अनेक अडचणी येत असल्याचेही दिसून येत आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये तूर्त मोहीम नाही

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आकडा वाढत आहे. त्यादृष्टीने अनेक परिसर हे पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने तूर्तास या झोनमधील परिसरात ही मोहीम कार्यरत नाही. रुग्णसंख्येचा दर ओसरल्यास तेथील मुलांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.