मुंबई : मोबाईल विक्रीवर शासनाचे नियंत्रण राहावे म्हणून नियामक मंडळ स्थापन करण्याची मागणी आॅल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रीय स्तरावर मोबाईल रिटेलर्सला एकत्र आणण्यासाठी असोसिएशनने मोबाईल अॅप तयार केल्याची घोषणाही यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष शांतीलाल गाला यांनी केली.गाला म्हणाले, आॅनलाईन पद्धतीने मोबाईल खरेदीचे प्रमाण दिवसांगणिक वाढत आहे. मात्र त्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही. ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतरही मदतीसाठी कुठे धाव घ्यायची, याबाबत आॅनलाईन खरेदीमध्ये स्पष्टता नाही. शिवाय अधिक व्हॅट असलेल्या राज्यातून मोबाईल खरेदी करून आॅनलाईन पद्धतीने कमी व्हॅट असलेल्या राज्यात विक्री करण्याचे प्रकारही सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जीएसटी कर प्रणालीनंतर या प्रकार बंद होणार असला, तरी मोबाईल कॉलच्या दरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शासनाने मोबाईल दरांवरही नियंत्रण ठेवण्याची मागणी गाला यांनी केली.मोबाईलच्या किंमतीत होणारे चढ-उतार आणि मोबाईल संदर्भातील विविध माहिती देशातील २ लाख मोबाईल रिटेलर्स आणि कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी संघटनेने एका अॅपची निर्मिती केली आहे. गुरूवारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश लाखयानी या अॅपचे लोकार्पण करतील. केवळ अधिकृत रिटेलर्सला हे अॅप मोफत स्वरूपात डाऊनलोड करता येणार आहे. कारण अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करताना जी माहिती भरावी लागेल, त्यात व्हॅट टीआयएन क्रमांक भरावा लागणार आहे.ग्राहकांना होणार फायदा!मोबाईलच्या किंमतीत वेळोवेळी कपात होत असते. मात्र रिटेलर्सपर्यंत ती माहिती पोहचली नाही की ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतो. दुकानदारांना मात्र मुळ किंमतीत झालेली कपात कंपनी देते. परिणामी या अॅपच्या माध्यमातून कमी होणाऱ्या किंमतीची माहिती रोजच्या रोज रिटेलर्सला मिळणार आहे. शिवाय एखाद्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीचा क्रमांक अॅपवर दिल्यास त्याचे तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्नही संघटना करणार आहे.
मोबाइल विक्रीवर नियामक मंडळ स्थापन करा
By admin | Updated: August 27, 2015 04:37 IST