Join us

‘मुंबईच्या प्रत्येक प्रभागांमध्ये गणपती विसर्जनासाठी मूर्तीदान केंद्र उभारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 02:11 IST

पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांची पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे मागणी

- मनोहर कुंभेजकर मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठे सावट आहे. गणपती विसर्जनाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईच्या प्रत्येक प्रभागामध्ये गणपती विसर्जनासाठी मूर्तीदान केंद्र उभारावे, अशी आग्रही मागणी पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना एका पत्रकाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत २ आॅगस्ट रोजी पालिकेतील शिवसेना नगरसेवकांची झूम मीटिंग झाली होती. यावेळीही त्यांनी सदर मागणी केली होती.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागातील चौक, नाका व उद्याने या विविध महत्त्वाच्या ठिकाणी मूर्तीदान केंद्र उभारावीत. जेणेकरून विसर्जनाला नागरिक गर्दी करणार नाहीत आणि आपल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका कर्मचाऱ्यांच्या हाती स्वाधीन करतील. नंतर मनपा कर्मचारी हे मूर्तीचे पावित्र्य राखून जवळच्या नैसर्गिक किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. गणपती विसर्जनासाठी गृहनिर्माण सोसायटी आणि गृहसंकुले यांच्याकडे जागा उपलब्ध असल्यास आणि त्यांनी पुढाकार घेतल्यास मनपाने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी त्यांना सर्व सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.दहिसर प्रभाग क्रमांक ७ मध्ये पावडेवाडी येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून मूर्तीदान क्रेंद ही संकल्पना राबवण्यास पालिका प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.गणपती विसर्जनासाठी नगरसेवक निधी वापरण्याची पालिका प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.