Join us  

मालाडचा एरंगळ बीच होणार पर्यटन केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 6:49 PM

मुबंईच्या सौंदर्यात भर पडणार

मनोहर कुंभेजकर

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुबंईच्या सौंदर्यात भर पडणार असून उत्तर मुंबईच्यामालाड पश्चिम येथील एरंगळ बीचचा पर्यटन केंद्र  म्हणून भविष्यात विकास होणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि मत्स्यव्यवसाय, बंदर खात्याचे मंत्री व मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार  अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व इतर अधिकाऱ्यांच्या समवेत नुकतीच मालाड (पश्चिम) येथील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची गेल्या शुक्रवारी पाहणी केली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मालाड पश्चिमेकडील किनार विशाल समुद्र किनारे सुसज्ज आहे. एरंगळ बीचची जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. एरंगळ किनारपट्टी जवळ असलेले अक्सा बीच आणि मार्वे बीच देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. या बीचेसला भेट देण्यासाठी दूरवरुन मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. जर सरकारने ऑरेंज बीचच्या एमटीडीसी अंतर्गत भूखंडावर पुरेशा सुविधांनी सुसज्ज पुरेशी पर्यटन केंद्रे तयार केली, तर सरकारला आर्थिक फायदा होईल आणि सुसज्ज  पर्यटन केंद्र निर्माण होईल. तसेच या तीन समुद्र किनारी राहणाऱ्या स्थानिकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. त्यामुळे येथील समुद्रकिनारपट्टीचा पर्यटन केंद्राच्या सुविधांचा विकास झाल्यास त्याचा लाभ पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना मिळू शकेल अशी मागणी आपण 2015 पासून सातत्याने करत आहे. आता आपल्या अथक प्रयत्नांना मुहूर्तस्वरूप मिळत असल्याचे उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना 6 डिसेंबर 2015, 24 डिसेंबर 2015 तसेच  तत्कालीन पर्यटनमंत्र्यांनाही सन 2016, 2017 मध्ये सतत पत्राद्वारे  मालाड उपनगराचा पश्चिमेकडील किनार विशाल समुद्राच्या किनारे सुसज्ज असून या बीचचा विकास करावा अशी आग्रही मागणी आपण केली होती अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा वर्षात सरकारशी या सर्व विषयांवर विस्तृत पत्रव्यवहार केले. या संदर्भात  पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे आणि मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री  अस्लम शेख यांना पत्रव्यवहार देखिल केला होता. आणि त्यांची भेट सुद्धा घेतली होती. एरंगळ पर्यटन केंद्राबाबत आपण भविष्यात सरकारबरोबर आपल्या अनेक काल्पनिक सूचनांवर चर्चा देखिल करणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

एरंगळची बारावीची जत्रा : एरंगळ हे गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला सुमारे बारा-तेरा किलोमीटर अंतरावरील समुद्रकिनार पट्टीजवळ वसलेलं आहे.  एरंगळ गावात इ. स. १५७५ साली बांधलेलं संत बोनाव्हेंचर पुरातन चर्च  आहे. दर्याच्या वा-यावादळाशी सामना करत गेली जवळपास ४५५ वर्ष हे चर्च आजही एरंगळ समुद्रकिनारी दिमाखात उभे आहे. या चर्चमध्ये संत बोनाव्हेंचर यांची मोठी मूर्ती असून हे संत म्हणजे तेराव्या शतकात इटली देशात होऊन गेलेला एक मठाधिपती, गाढा विद्वान व तत्त्ववेत्ता. या महापंडिताने लिहिलेले धर्मग्रंथ ख्रिस्ती परंपरेत आठशे वर्षानंतरही आजही अभ्यासले जात आहेत. संत  बोनाव्हेंचर हे एरंगळ गावचे आश्रयदाते व संरक्षणकर्ते आहेत,अशी या गावकऱ्यांची श्रद्धा आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एरंगळ येथील बारर्वीची जत्रा भरते. मुंबईसह विरार, वसई, बदलापूर, पालघर या विविध भागातून एरंगळ बीचच्या बारवीच्या प्रसिद्ध जत्रेला विविध जाती धर्माचे लाखो भाविक या यात्रेला एकत्र येतात. राष्ट्रीय एकोपा व सर्वधर्म स्नेहभाव जोपासणारी अशी ही येथील जत्रा आहे. 

टॅग्स :मुंबईमालाड पश्चिमट्रॅव्हल टिप्सपर्यटन