Join us  

एका दिवसात २ हजार उंदरांचा सफाया;पालिकेची दादर, माहीम, धारावीमध्ये कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:04 AM

परिसर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी पालिका प्रशासनाकडून अविरतपणे विविध उपाययोजना केल्या जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून मूषक विनाशक विशेष मोहिमेंतर्गत दादर, माहीम आणि धारावी भागामध्ये २,०८० उंदरांचा नायनाट करण्यात आला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात उंदरांचा नायनाट करण्याचा हा आजवरच्या मोहिमेमधील उच्चांक असल्याची माहिती पालिकेने दिली.

परिसर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी पालिका प्रशासनाकडून अविरतपणे विविध उपाययोजना केल्या जातात. सर्व प्रशासकीय विभागांमध्ये मूषक नियंत्रणाची कार्यवाही नियमितपणे सुरू असते. नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार, घरांमध्ये उंदराचे सापळे लावून किंवा घराबाहेरील परिसरात बिळांमध्ये नाशक गोळ्या टाकून मूषक नियंत्रणाची कार्यवाही नियमितपणे केली जाते. उंदरांचा उपद्रव असलेल्या परिसरात सर्वेक्षण घेऊन, त्या ठिकाणी मूषक नियंत्रणाची विशेष मोहीम राबविली जाते. याच धर्तीवर कीटकनाशक विभागाच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील दादर, माहीम आणि धारावी परिसरात मूषक नियंत्रण विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

वर्षभरात ४ मोहिमा या मोहिमेंतर्गत या परिसरातील एकूण ९,०६५ बिळांमध्ये झिंक फॉस्फाइड व सेलफॉस आणि ५५ किलो गव्हाच्या पिठाचे मिश्रण असलेल्या गोळ्या टाकण्यात आल्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी २,०८० मृत मूषक गोळा करण्यात आले. 

 या परिसरामध्ये फेब्रुवारी, २०२३ पासून आतापर्यंत अशा प्रकारच्या चार विशेष मोहीम राबविण्यात आल्या असून, इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच उंदरांचा नायनाट करण्यात आला आहे. ‘जी उत्तर’ विभागाचे कीटक नियंत्रण अधिकारी, १३ पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि ४५ कामगारांच्या टीमने नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करत ही कार्यवाही पूर्ण केली.

टॅग्स :मुंबई