Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळाच्या ओघात दगडी पाटी नामशेष!

By admin | Updated: June 16, 2015 22:57 IST

शाळा सुटली। पाटी फुटली।। आई मला भूक लागली।। या लहान मुलांच्या ओठावरील ओळी आठवण्याचे कारण म्हणजे

बाळासाहेब सावर्डे,  रसायनीशाळा सुटली। पाटी फुटली।। आई मला भूक लागली।। या लहान मुलांच्या ओठावरील ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सोमवारपासून प्राथमिक-माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. बाजारपेठेत आपल्या पाल्यासाठी दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी होत असली तरी यात दगडी पाटी कालबाह्य झालेली दिसते. दगडी पाटीवर पेन्सिलने लिहायचे, पाढे, मुळाक्षरे, अंक गिरवायचे. यात चूक झाली की पाटी पुसून पुन्हा लेखन करायचे, अक्षर वळणदार करण्यासाठी याशिवाय चांगला उपाय पूर्वी नव्हता. मात्र आता दगडी पाटीच नामशेष झाल्याने मुळाक्षरे गिरवणे, सुंदर अक्षर यांचा विद्यार्थ्यांना सरावच नाही. हल्ली ज्युनिअर, सीनिअर्सच्या मुलांनाही वह्यांवर लिहिण्याची सक्ती असल्याने पाटी हा प्रकारच मुळी दिसेनासा झाला आहे. गरीब मुले याच पाटीचा उपयोग वहीखाली ठेवण्यासाठी पॅडप्रमाणे करायचे. रविवारी सुट्टीच्या दिवशी ही पाटी कोळशाने घासून स्वच्छ केली जायची. शाळेच्या दगडी भिंतींवर पाटीवरची पेन्सिल घासून टोक काढले जायचे, अशी दगडी पाटी आता बाजारातही मिळेनाशी झाली आहे. त्यानंतर लाकडी वा प्लास्टिकची चौकट असलेली पत्र्याच्या पाटीने दगड पाटीची जागा घेतली. मात्र आता तीही दिसेनाशी झाली असून पत्र्याऐवजी प्लास्टिकची रंगीबेरंगी चौकट व पुठ्ठ्याला काळा रंग दिलेली व प्लास्टिकच्या चौकटीवर ए ते झेड लिपी कोरलेली पाटी आढळते. शिक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणानुसार हे बदल सर्वांनीच स्वीकारले असले तरी दगडी पाटीवर लेखन करून नाव कमावलेली मंडळी आजही या पाटीच्या आठवणी काढताना दिसतात. सध्या बाजारात पत्र्याच्या पाटीऐवजी प्लास्टिकच्या फ्रेममध्ये काळ्या रंगाचा पुठ्ठा बसवून व प्लास्टिक फ्रेमच्या पाट्या ४५ ते १०० रुपयांचा मिळत आहे. मात्र अशा पाट्यांवरही लेखन कमी होत आहे. त्यामुळे सुवाच्च अक्षरे दिसणेही दुर्लभ झाल्याचे शिक्षकमंडळी सांगतात.