Join us

ईपीएस पेन्शनधारकांचा आज मोर्चा, वांद्रे आयुक्तालयावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:09 IST

ईपीएस पेन्शनधारकांनी ३ हजार रुपये पेन्शनची मागणी करत वांद्रे येथील ईपीएफ आयुक्तालयावर गुरुवारी धडक मोर्चाची हाक दिली आहे. केंद्रीय कामगारमंत्र्यांनी ईपीएस पेन्शनवाढीस नकार दिल्याचा निषेधही या वेळी करणार असल्याचे सर्व श्रमिक संघटनेने सांगितले.

मुंबई : ईपीएस पेन्शनधारकांनी ३ हजार रुपये पेन्शनची मागणी करत वांद्रे येथील ईपीएफ आयुक्तालयावर गुरुवारी धडक मोर्चाची हाक दिली आहे. केंद्रीय कामगारमंत्र्यांनी ईपीएस पेन्शनवाढीस नकार दिल्याचा निषेधही या वेळी करणार असल्याचे सर्व श्रमिक संघटनेने सांगितले.संघटनेचे प्रमुख संघटक बी. के. आंब्रे म्हणाले, सध्या ईपीएस पेन्शनधारकांना एक हजार रुपयांहून कमी पेन्शन मिळत आहे. एसटी, बेस्ट, सहकारी बँका अशा १८६ उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत कामगारांना निवृत्तीनंतर ईपीएस पेन्शन मिळते. देशात ईपीएस पेन्शनधारकांची संख्या ६० लाखांच्या घरात असून राज्यात सुमारे ७ लाख पेन्शनधारक आहेत. मात्र पाच आकड्यांमध्ये पगार घेणाऱ्या कामगारांना मिळणारी पेन्शन ही फारच तुटपुंजी आहे. त्यात वाढ करण्याची मागणी करत विरोधी बाकावर बसलेल्या प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेच्या पिटीशन कमिटीसमोर २०१३ साली अर्ज दाखल केला होता. त्या वेळी कोशियारी कमिटीच्या अध्यक्षांनीही या मागणीला दुजोरा देणारा निर्णय दिला होता. दरम्यान, वर्धा येथील पेन्शनधारकांच्या मेळाव्यात जावडेकर यांनी सत्तेवर आल्यास ९० दिवसांच्या आत ३ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याचे आश्वासित केले होते. मात्र सत्तेवर येताच त्यांना आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप आंब्रे यांनी केला आहे.काय आहेत मागण्या?- किमान दोन आणि कमाल चार व्यक्ती या पेन्शनधारकांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या गरजा भागतील, अशी वाढ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. कोशियारी कमिटीचा अहवाल स्वीकारून अंतरिम वाढ देताना ९ हजार रुपये आणि महागाई भत्ता देण्याचेही आवाहन संघटनेने केले आहे.

 

 

टॅग्स :मुंबई