Join us  

वातावरणातील प्रदूषण ठरते ‘सीओपीडी’ला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 3:42 AM

फुप्फुसाचा आजार; धूम्रपान, ई-सिगारेटही घातक, वेळीच निदान करणे हे आव्हान असल्याचे तज्ज्ञांचे मत

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सीओपीडी हा आजार गंभीर असून, यामध्ये हृदयरोग प्रथम क्रमांकावर आहे, परंतु सीओपीडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता २०३० पर्यंत सीओपीडीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वातावरणातील प्रदूषण, तसेच धूम्रपान यामुळे सीओपीडीसारख्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सीओपीडी अर्थात क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज हा एक फुप्फुसाचा आजार आहे. त्यामध्ये फुप्फुसामध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असतो. निदान वेळेत झाले नाही, तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. सीओपीडी हा वाढणारा आजार आहे आणि परिणामी तो जुना झाल्यास घातक ठरतो.श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अव्या बन्सल यांनी सांगितले की, या आजाराचे वेळीच निदान करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. काही वेळेस सीओपीडीची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत नाहीत, विशिष्ट चाचण्यांनंतरच त्याचे निदान होते. सीओपीडीचे निदान करण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची फुप्फुसांची कार्यक्षमता चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे सीओपीडी आहे का आणि तो कमी, मध्यम की तीव्र स्वरूपाचा आहे, याविषयी माहिती मिळते. सीओपीडी आहे की नाही, हे जाणून घेणे फारच कठीण असून प्रश्नावली, तसेच चाचण्यांच्या माध्यमातूनच या आजाराचे निदान करणे शक्य होते.दुसरे आव्हान म्हणजे धूम्रपान अथवा लाकूड जाळल्यानेदेखील श्वसनासंबंधी विकार होऊ शकतात अथवा श्वासोच्छवासात अडचणी निर्माण होऊ शकतात, याची लोकांना माहितीच नसते, असेही डॉ. बन्सल यांनी सांगितले. तर, डॉ. श्रेयस गोडबोले यांनी सांगितले की, धूम्रपान करणे हे सीओपीडीसाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे दररोज धूम्रपान करत असल्यास ते न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ई - सिगारेटही घातक आहे. धूम्रपान निवारण थेरपीची निवड करून धूम्रपानापासून लांब राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले फुप्फुस अधिक कार्यक्षम करता येईल....तर त्वरित चाचणी करणे गरजेचेदीर्घकाळ खोकला, श्वास घेण्याच्या क्रियेत अडचणी निर्माण होणे, धाप लागणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित चाचणी करून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला पीएफटी, एक्सरेसारख्या चाचण्यांच्या माध्यमातून पीएफटीचे निदान केले जाते. निदान झाल्यानंतर रुग्णांनी तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत, असे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.

टॅग्स :वायू प्रदूषण