Join us  

कारशेड परिसरात २१ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास, पर्यावरणप्रेमींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:11 AM

घनदाट जंगलात प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या दोन किलोमीटरच्या परिघात १२५ मिनिटांमध्ये २१ प्रजातींच्या १४३ पक्ष्यांची नोंद पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली.

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीतील घनदाट जंगलात प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या दोन किलोमीटरच्या परिघात १२५ मिनिटांमध्ये २१ प्रजातींच्या १४३ पक्ष्यांची नोंद पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली. मेट्रो कारशेड परिसरामध्ये जैवविविधता नाही, वन्यजीव नाहीत, असे एमएमआरसीएलचे म्हणणे आहे. हा दावा खरा की खोटा हे पडताळून पाहण्यासाठी आरेला भेट द्या, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. मागील रविवारी झाडांची ओळख आणि पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला.सुमारे १२५ मिनिटांत २१ प्रजातींचे १४३ पक्षी प्रस्तावित मेट्रो कारशेडपासून दोन किलोमीटर परिघाच्या आत अवघ्या दोन तासांत ‘रॉ’ संस्थेच्या जयराज नायक यांनी नोंदविले. पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या आधारावर योग्य पद्धतीने निरीक्षण झाले, तर सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री या वेळेत पशू-पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटक दिसू शकतात, असे मत ‘रॉ’ संस्थेने नोंदविले आहे. आरेमध्ये दिसणारे पशू-पक्षी, कीटक आणि झाडांची शास्त्रीयदृष्ट्या नोंदणी होणे गरजेचे आहे. ‘रॉ’च्या माध्यमातून लवकरच उपक्रम सुरू होणार असून मुंबईकरांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ८ वाजता आरे व्हीआयपी गेस्ट हाउसपासून या उपक्रमाला सुरुवात होईल.

टॅग्स :आरे